Ashok Saraf Birthday : मराठी सिनेसृष्टीचे महानायक अशोक सराफ (Ashok Saraf) आज आपला 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीत 'मामा' म्हणून लोकप्रिय असलेल्या अशोक सराफ यांनी हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या विनोदी टायमिंगने त्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. 


बॅंकेची नोकरी सोडली अन् अभिनय क्षेत्राकडे वळले...


अशोक सराफ यांना बालपणीच अभिनयाची गोडी लागली होती. पण त्यांनी बॅंकेत नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत स्वत:च्या इच्छेविरुद्ध त्यांनी तब्बल 10 वर्षे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. पुढे त्यांनी बॅंकेतली नोकरी सोडली आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचं ठरवलं. 


अशोक सराफ यांचा सिनेप्रवास जाणून घ्या...


'ययाती' या नाटकाच्या माध्यमातून अशोक सराफ यांनी त्यांच्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर अनेक संगीत नाटकांमध्ये त्यांनी छोटी-मोठी काम केली. दरम्यान 'दोन्ही घरचा' या सिनेमासाठी त्यांना विचारणा झाली. या सिनेमात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर त्यांचा 'पांडू हवालदार' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमामुळे ते रातोरात स्टार झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 


अशोक सराफ यांनी सिनेमे आणि नाटकांसोबत मालिकांमध्येही काम केलं. 'हम पाच' या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहेचले. तब्बल पाच वर्षे या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'दामाद' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयाने अशोक सराफ यांनी तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. खट्याळ प्रियकरापासून ते वयोवृद्ध म्हाताऱ्यापर्यंत फक्त विनोदीच नाही तर गंभीर भूमिकादेखील अशोक सराफ यांनी चोख पार पाडल्या आहेत.  


अशोक सराफ यांना मामा नाव कसं पडलं? 


'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगताना दिसत आहेत. ते म्हणाले,"कोल्हापुरात एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कॅमेरामॅन त्याच्या लेकीला सेटवर घेऊन आला आणि तिला म्हणाला,"हे कोण? हे आहेत अशोक मामा". लेकीला सांगण्यासोबत तो सेटवर मला मामा अशी हाक मारत असे. पुढे सेटवरील सर्व मंडळी मामा अशी हाक मारू लागले. त्यानंतर हळूहळू सर्वच मंडळी मामा म्हणू लागली". 


संबंधित बातम्या


Ashok Saraf : अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस; जाणून घ्या अशोक मामांबाबत 75 गोष्टी