Aryan Khan Shooting Started : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. आर्यन खान दिग्दर्शित पहिली वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजच्या शूटिंगला आता सुरुवात झाली असून या सहा भागांच्या वेबसीरिजसाठी चाहते उत्सुक आहेत. शाहरुख खान या वेबसीरिजची निर्मिती करत आहे.


डिसेंबर 2023 मध्ये आर्यन खानने त्याच्या संहितेचं काम पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. आता आजपासून या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आर्यन खानच्या या सीरिजचं नाव 'स्टारडम' असं ठेवण्यात आलं आहे. वरळीतील काही भागांत या सीरिजचं शूटिंग होत आहे. लेकाला त्याच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननेदेखील हजेरी लावली होती. 






सिनेसृष्टीवर बेतलेली 'स्टारडम' 


मीडिया रिपोर्टनुसार,'स्टारडम' या सीरिजवर 350 लोक काम करत आहेत. नवोदित अभिनेता लक्ष्य लालवानी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'स्टारडम' ही सीरिज सिनेसृष्टीवर बेतलेली असल्याचं म्हटलं जात आहे. 


आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' ही सीरिज पुढील वर्षी ओटीटीवर रिलीज होणार आहे. आर्यनला कॅमेऱ्यासमोर काम करण्यापेक्षा कॅमेऱ्यामागे काम करायला जास्त आवडत आहे. त्यामुळे दिग्दर्शनापासून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तर दुसरीकडे किंग खानची लेक सुहाना खान लवकरच अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे. जोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात सुहानासह खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना आणि मिहिर आहूजा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


आर्यनच्या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणारा लक्ष्य लालवानी कोण आहे? (Who Is Lakshya Lalwani)


लक्ष्य लालवानीने मालिकांच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. 'वॉरियर हाई','प्यार तूने क्या किया', 'परदेस में है मेरा दिल', 'अधुरी कहानी हमारी' आणि 'पोरस' सारख्या मालिकांमध्ये लक्ष्य लालवानीने काम केलं आहे. 800 ऑडिशन्सनंतर आर्यनने लक्ष्य लालवानीची निवड केली आहे. आर्यन खानचा मोठा चाहतावर्ग असून त्याच्या आगामी वेबसीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Aryan Khan : आर्यन खानच्या 'Stardom'चा हिरो निश्चित! 800 ऑडिशन्सनंतर 'या' अभिनेत्याची निवड