Shakeel Badayuni Death Anniversary: असं म्हणतात एखाद्या शायरची गोष्ट त्याच्या जन्मापासून सुरू होते, मात्र ही गोष्ट त्याच्या मृत्यूनंतर संपत नाही. त्याचे शब्द  काळ आणि वयाच्या मर्यादा ओलांडून त्यांची स्मृती जिवंत ठेवतात. कोणीतरी म्हटलंच आहे, कवी जन्माला येतात पण मरत नाहीत. आज आपण अशाच एका, कवी, शायर आणि गीतकाराबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या बद्दल असं बोललं जात की, त्यांच्या गीतांनी बॉलिवूडला प्रेम करणं शिकवलं. या सुप्रसिद्ध गीतकाराचे नाव आहे शकील बदायुनी. शकील बदायुनी यांची आज (20 एप्रिल) पुण्यतिथी आहे. शकील बदायुनी यांचे नाव ऐकताच त्यांनी लिहिलेली गाणी न कळत आठवू लागतात. क्वचितच लोकांना माहित असेल की, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात गीतकार म्हणून नाही तर दिल्लीतील पुरवठा विभागातील अधिकारी म्हणून सुरू केली होती.  20 एप्रिल 1970 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांची गाणी आणि कविता जगभरातील लोकांच्या ओठावर आहेत.


उत्तर प्रदेशात झाला जन्म 


उत्तर प्रदेशातील बदायुन शहरात 3 ऑगस्ट 1916 रोजी जन्मलेले शकील अहमद उर्फ ​​शकील बदायुनी यांनी 1942 मध्ये बी.ए पदवी मिळवल्यानंतर दिल्ली गाठली आणि तेथे त्यांनी पुरवठा विभागात पुरवठा अधिकारी म्हणून पहिली नोकरी स्वीकारली. या दरम्यान ते मुशायऱ्यात सहभागी होत राहिले, ज्यामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली. आपल्या कवितेच्या अखंड यशाने प्रोत्साहित होऊन शकील बदायुनी यांनी नोकरी सोडली आणि 1946 मध्ये दिल्लीहून मुंबईत आले.


मुंबईत येताच त्यांची भेट त्याकाळातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते ए आर कारदार आणि महान संगीतकार नौशाद यांच्याशी झाली. नौशादच्या सांगण्यावरून शकील यांनी 'हम दिल का अफसाना दुनिया को सुना देंगे, हर दिल में मोहब्बत की आग लगा देंगे' हे गीत लिहिले. शकील बदायुनी यांनी 1947 मध्ये आलेल्या 'दर्द' चित्रपटातील 'अफसाना लिख रही हूं' ही गीत लिहिले. हे गीत इतके गाजले की त्यानंतर त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही.


नौशाद आणि हेमंत यांच्यासोबत हिट राहिली जोडी


प्रसिद्ध संगीतकार नौशाद आणि हेमंत कुमार यांच्यासोबत शकील बदायुनी यांची जोडी खूप चांगली जमली. शकील बदायुनी यांनी हेमंत कुमार यांच्या संगीतावर 'बेकरार कर के हमें यूं न जाइये'.., कहीं दीप जले कहीं दिल.. जरा नजरों से कह दो जी निशाना चूक ना जाए.. (बीस साल बाद, 1962) आणि भंवरा बडा नादान है बगियन का मेहमान है.., ना जाओ सइयां छुडा के बहियां.. (साहब बीबी और गुलाम, 1962), जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आए.. (जिंदगी और मौत, 1963) सारखे प्रसिद्ध गीत लिहिले. 


तीनदा मिळवला फिल्मफेअर पुरस्कार 


शकील बदायुनी यांना त्यांच्या गाण्यांसाठी सलग तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या चौधवी का चांद या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'घराना' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला. याशिवाय 1962 मध्ये 'बीस साल बाद' चित्रपटातील 'कहीं दीप जले कहीं दिल...' या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


शकील बदायुनी यांनी लिहिलेले काही प्रसिद्ध गीत 


अफसाना लिख रही हूं (दर्द)


चौदहवीं का चांद हो या आफताब हो (चौदहवीं का चांद)


जरा नजरों से कह दो जी निशाना चूक न जाये (बीस साल बाद)


नन्हा मुन्ना राही हूं देश का सिपाही हूं (सन ऑफ इंडिया)


सुहानी रात ढल चुकी (दुलारी)


दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा (मदर इंडिया)


प्यार किया तो डरना क्या (मुगले आजम)