मुंबई : नुकतेच आई-बाबा बनलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या चिमुकलीची एक झलक पाहण्यासाठी दोन्ही स्टार्सचे चाहते उत्सुक आहेत. मुलीच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर करणारा विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा आपल्या मुलीचा फोटो सगळ्यांना कधी शेअर करतात याची चाहते वाट पाहत आहेत. परंतु एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली आणि अनुष्काने मीडियाला, विशेषत: फोटोग्राफर्सना विशेष आवाहन केलं आहे. "आम्हाला मुलीचं खासगी आयुष्य सुरक्षिते ठेवायचं आहे. त्यामुळे तिचे फोटो काढू नका किंवा प्रकाशित करु नका," असं त्यांनी म्हटलं आहे.


प्रेग्नन्सीदरम्यानच फोटोग्राफर सातत्याने अनुष्काचे फोटो क्लिक करत होते आणि ते प्रकाशित करत होते. आता प्रसुतीनंतर अनुष्का आणि विराटने फोटोग्राफर्स तसंच मीडियाला उद्देशून आवाहन केलं आहे की, "इतकी वर्षे आमच्यावर प्रेम करण्यासाठी तुमचे आभार. हा आनंदाचा क्षण तुम्ही सोहळ्याप्रमाणे साजरा करत आहात हे पाहून आम्ही भारावलो. पण आई-वडील म्हणून आम्हाला फारच साधारण विनंती/आवाहन करायचं आहे. आम्हाला आमच्या लेकीचं खासगी आयुष्य अबाधित ठेवायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आणि सहकार्याची आवश्यकता आहे.


विराट आणि अनुष्काने शेअर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे लिहिलं आहे की, "आमच्याशी संबंधित माहिती तुम्हाला मिळेल याची आम्ही कायमच काळजी घेतली आहे. पण आम्ही दोघे तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, तुम्ही आमच्या लेकीशी संबंधित कोणतीही माहिती (फोटो काढू नका) प्रकाशित किंवा प्रसारित करु नका. आम्हाला आशा आहे की, तुम्ही आमच्या भावनांचा मान राखाल आणि त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत."


11 जानेवारी रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या मुलीच्या जन्माच्या दिवशीच विराटचा भाऊ विकास कोहलीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोद्वारे त्याने विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोमध्ये मुलीचे फक्त पाय दिसत होते. परंतु यानंतर विकासने स्पष्टीकरण देत लिहिलं होतं की जो फोटो मी शेअर केला होता, तो अनुष्का-विराटच्या मुलीचा नाही, त्यामुळे तो मीडियाने प्रसिद्ध करु नये.