Anurag Kashyap On Amruta Subhash : बॉलिवूडमध्ये स्वत: ची वेगळी छाप सोडणारा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) ओळख आहे. अनुराग हा आपल्या बेधडक वक्तव्यासाठीही ओळखला जातो. अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील एका बाजूवर भाष्य केले. मॅनेजरमुळे कलाकारांचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराग कश्यपने अभिनेत्री अमृता सुभाषसोबत (Amruta Subhash) घडलेला किस्सा सांगितला. मॅनेजरमुळे अमृताला चित्रपटातून काढल्याचा किस्साही अनुरागने सांगितला.
'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यपने सांगितले की, अमृता सुभाषसोबत मी तीन वेळेस काम केले आहे. त्यामुळे ती किती साधी आहे हे मला माहित आहे. आम्ही एक प्रोजेक्टवर काम करत होतो आणि अचानकपणे तिच्या मॅनेजरकडून अनेक मागण्यांची यादी आली. ती यादी पाहून मी तू ठीक आहेस ना, असा प्रश्नच त्याला केला. अमृताच्या मॅनेजरने केलेल्या मागणीत तिला सिंगल डोअर व्हॅनिटीपासून वेगवेगळ्या मागण्या होत्या. ती मागण्यांची यादी वाचून मी मॅनेजरला फोन केला आणि अमृताऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतले असल्याचे सांगितले.
अन् अमृताने केला फोन...
मॅनेजरला हा निरोप दिल्यानंतर अमृता सुभाषचा फोन आला आणि काय झाले असे तिने विचाराले. तिच्या मॅनेजरने काय काय मागण्या केलेल्या याची तिलाही माहिती नव्हती. शेवटी तिने मॅनेजरला यावरून झापलं असल्याचेही अनुराग कश्यपने सांगितले. सिनेसृष्टीत असे अनेकदा घडते. कलाकारांनी मोठ्या मागण्या केल्या तर मी त्यांना थेट प्रोजेक्टमधून वगळतो असेही अनुराग कश्यपने स्पष्ट सांगितले.
अनुराग कश्यप आणि अमृता सुभाष यांनी रमण राघव 2.0, चोक्ड आणि सेक्रेड गेम्स या मध्ये एकत्र काम केले आहे.
अनुराग कश्यपने पुढे म्हटले की, ओटीटीची लाट, निर्माते आणि कलाकारांचे मॅनेजर यांच्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या मानधनात मोठी वाढ झाली आहे. त्याशिवाय अनुरागने हेअर ड्रेसर, मेकअप आर्टिस्ट यासारखी कामे करणाऱ्या एजन्सीवरही खापर फोडले आहे. या एजन्सींनीदेखील मोठ्या प्रमाणावर फीस् घेतात. मी अशा लोकांपासून दोन हात लांब राहत असल्याचे त्याने सांगितले.
अनुराग कश्यप हा 'बॅड कॉप' या आगामी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेब सीरिजमध्ये तो खलनायकी भूमिका साकारत आहे. गुलशन देवैह, हरलीन सेठी, सौरभ सचदेव यांच्याही भूमिका असून डिस्ने-हॉटस्टार प्लसवर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.