Ratna Pathak Shah On Paresh Raval Anupam Kher : अभिनेता नसिरुद्दीन शहा (Naseeruddin Shah) आणि अभिनेत्री रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) यांची जोडी बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारी जोडी आहे. आपल्या अभिनयासोबत राजकीय मतेदेखील निर्भिडपणे व्यक्त करतात. नसिरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक यांनी आपल्या नात्यात पारदर्शकता जोपासली आहे. रत्ना पाठक यांनी रुपेरी पडद्यासह छोटा पडदा आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
रत्ना पाठक यांनी परेश रावल (Paresh Rawal), अनुपम खेर (Anupam Kher) सारख्या दिग्गज कलाकारांसोबतही स्क्रिन शेअर केली आहे. अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनीदेखील त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली आहे. विशेष म्हणजे या परेश रावल-अनुपम खेर आणि रत्ना पाठक, नसिरुद्दीन शहा यांची राजकीय मते, वैचारीक भूमिका भिन्न आहेत. तरी देखील या भिन्न विचारांच्या कलाकारांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.
परेश रावल, अनुपम खेरसोबत एकत्र काम
रत्ना पाठक यांनी 'द ललनटॉप'ला नुकतीच एक मुलाखत दिली. यादरम्यान त्यांनी अनुपम खेर आणि परेश रावल यांच्यासोबत काम करण्याबाबतही सांगितले. परेश आणि अनुपम यांची विचारधारा वेगळी आहे, तुमची विचारधारा वेगळी आहे, असा खुलासा त्यांनी केला. असे असूनही त्याच्यासोबत काम का केले? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
रत्ना पाठक यांनी सांगितले की, तुमचा विचार वेगळा असला तरीही तुमच्यात मैत्री असू शकते, असा विचार करणारी आमची पिढी असल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही एखाद्या गोष्टीवर सहमत नसले तरी त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होईलच असे नाही, असेही रत्ना पाठक यांनी सांगितले. आमचा दृष्टिकोन काहीही असला तरी आम्ही एकमेकांचा आदर करण्यावर विश्वास ठेवतो असेही त्यांनी म्हटले.
वडील संघाचे, तर आई कम्युनिस्ट विचारांची...
रत्ना पाठक यांनी यावेळी आपल्या कुटुंबाचे उदाहरण देताना सांगितले की, माझे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबातील होते आणि माझी आई ही कम्युनिस्ट विचारांची होती. आमच्या घरात विविध विषयांवर, मुद्यांवर सतत वाद-विवाद होत असे. तरीही आम्ही सगळे एकत्रितपणे आनंदाने राहत असू.
या चित्रपटात परेश रावल-अनुपम खेरसोबत केलंय काम
रत्ना पाठक शाह आणि नसिरुद्दीन शाह या दोघांनी परेश रावल आणि अनुपम खेर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दो हमारे दो' या चित्रपटात रत्नाने परेश रावलसोबत काम केले होते. तर तिने अनुपम खेरसोबत 'ट्रायल बाय फायर' या शोमध्ये काम केले आहे.
याशिवाय रत्ना आणि नसीरुद्दीन 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पेस्टनजी' चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत दिसले होते. परेश रावल यांनी नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत 'यूं होता तो क्या होता' या चित्रपटात काम केले आहे. 2006 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट नसिरुद्दीन यांनी दिग्दर्शित केला होता. नसिरुद्दीन आणि अनुपम यांनी 'ए वेनस्डे'मध्ये एकत्र काम केले आहे. हा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी रंगली होती.