Anurag Kashyap Banned Movie :  बॉलिवूडमध्ये विविध विषय हाताळताना कथेच्या आवश्यकेतेनुसार हिंसक दृश्यांबाबत हात आखडता न घेणारा प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपला (Anurag Kashyap) ओळखले जाते. अनुराग कश्यपचा एक चाहता वर्गदेखील आहे. पटकथा लेखन, संवादासह त्याची दिग्दर्शनावरही चांगली पकड आहे. अनुराग कश्यप आणि सेन्सॉर बोर्डचे वादही चांगले चर्चेत आले आहेत.  अनुरागचा असाच एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही. 


जवळपास चार दशकांपूर्वी पुणे शहरात सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. बाजारपेठा, रस्ते ओस पडले होते. रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. याचे कारण म्हणजे पुणे शहरात चार मित्रांनी केलेले हत्याकांड. या चार मित्रांनी जवळपास 10 जणांच्या हत्या केलेल्या. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्या प्रकरण म्हणून ओळखल्या या प्रकरणाची गोष्ट अनुराग कश्यप यांनी मोठ्या पडद्यावर आणली होती. मात्र, चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. सेन्सॉर बोर्डाने याला मंजुरीच दिली नाही. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. 


सगळा महाराष्ट्र हादरवणाऱ्या जोशी-अभ्यंकर हत्या प्रकरणावर अनुराग कश्यपने पांच या चित्रपटाची कथा लिहिली आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटाद्वारे अनुराग कश्यप  सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार होता. केके मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्या, जॉय फर्नांडिस, तेजस्विनी कोल्हापुरे आदी कलाकारांच्या भूमिका होत्या. अनुराग कश्यपने सत्य घटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटाची कथा आपल्या खास स्टाइलने लिहिली होती. 


सेन्सॉरने घेतली हरकत... 


पांच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. सेन्सॉर बोर्डाने हिंसाचार, अमली पदार्थाचा वापर आणि  आक्षेपार्ह संवादावर आक्षेप घेतला होता. मात्र, काही कट्स आणि काही बदल सूचवत चित्रपटाला मंजुरी देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. अनुराग कश्यपने याचा विरोध केला. चित्रपटाचे पुन्हा शूटिंग करण्यासाठीदेखील पुरेसे बजेट नव्हते. त्यामुळे हा चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्र नसल्याने चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. 


आता कुठे पाहणार चित्रपट?


हा चित्रपट  टॉरेंट वेबसाइट्सच्या मदतीने प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवला गेला. आताही हा चित्रपट युट्युबवर मोफत पाहता येणार आहे. 


जानेवारी 1976 ते मार्च 1977 दरम्यान पुण्यात राजेंद्र यल्लाप्पा जक्कल (वय 25), दिलीप ज्ञानोबा सुतार (वय 21), शांताराम खानोजी जगताप (वय 23) आणि मुनव्वर हारून शाह (वय 21) यांनी दहा हत्या केल्या होत्या. सर्व मारेकरी टिळक रोड येथील अभिनव कला महाविद्यालयातील कमर्शियल आर्ट्सचे विद्यार्थी होते. 27 नोव्हेंबर 1983 रोजी त्याच्या गुन्ह्यांसाठी त्याला फाशी देण्यात आली. या घटनेवर मराठीत 'माफिचा साक्षीदार' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.