Bollywood Latest News : बॉलीवूडचे ग्लॅमरस, झगमगाट अनेकांना आकर्षित करतो. या ग्लॅमरस दुनियेत आपला ठसा उमटवण्याचे स्वप्न घेऊन दररोज अनेक तरुण मुंबईत पोहोचतात. मात्र, त्यापैकी काही मोजक्याच लोकांना त्यांचे स्वप्न साकारण्याची संधी मिळते आणि यशस्वी होतात. एक मुलगाही मोठी स्वप्ने घेऊन मुंबईत दाखल झाला होता. मेहनतीच्या जोरावर आज त्याच्याकडे भरपूर संपत्ती आणि अफाट कीर्ती आहे. एकेकाळी त्याचा पहिला पगार फक्त 50 रुपये होता.
हा मुलगा आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. हा मुलगा म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आहे. शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जन्म नोव्हेंबर 1965 मध्ये दिल्लीत मीर ताज मोहम्मद खान आणि लतीफ फातिमा यांच्या घरात झाला. शाहरुखच्या वडिलांचे 1981 मध्ये कर्करोगाने निधन झाले, तर त्याची आई मधुमेहाची रुग्ण होती आणि तिनेही 1991 मध्ये जगाचा निरोप घेतला. यावेळी शाहरुख संघर्षमय काळातून जात होता.
शाहरुख खानची अभिनय कारकीर्द कधी सुरू झाली?
शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीला छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. त्यांनी 1989 मध्ये 'फौजी' हा टीव्ही शो केला. या मालिकेतील लेफ्टनंट अभिमन्यू रायच्या भूमिकेतून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर शाहरुख खानने 'सर्कस', 'दिल दरिया' सारखे शो देखील केले. टीव्हीवर बरीच ओळख निर्माण केल्यानंतर तो बॉलिवूडकडे वळला आणि 1992 मध्ये आलेल्या 'दिवाना' सिनेमातून पदार्पण केले. किंग खानचा हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला होता. यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला.
या चित्रपटानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही आणि एकापाठोपाठ अनेक उत्तम चित्रपट दिले. काही वेळातच तो रोमान्स किंग बनला. मागील वर्षी शाहरुखच्या तीन बॅक टू बॅक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. वर्षाच्या सुरुवातीला किंग खानचा 'पठाण' हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर आलेल्या 'जवान'ने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा 'डंकी'ही सुपरहिट ठरला होता.
शाहरुख खानची पहिली कमाई किती होती?
शाहरुख खान आज भारतीय सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार असला तरी तो आपले सुरुवातीचे दिवस विसरला नाही. एका मुलाखतीत शाहरुखने आपल्या कमाईबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले की, पंकज उधास यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये मी काम केले होते. त्यावेळी मला 50 रुपये मिळाले होते. या पैशातून मी त्यावेळी आग्र्यातील ताज महाल पाहण्यास गेलो होतो, असे त्याने सांगितले.
शाहरुख खानची संपत्ती किती?
शाहरुख खानची सिने इंडस्ट्रीतील पहिली कमाई 50 रुपये असली तरी तो आज अब्जाधीश आहे. ग्लोबल सुपरस्टार असलेला शाहरुख खानची एकूण संपत्ती ही 6300 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. मागील दशकभराच्या काळात शाहरुखच्या संपत्तीत 300 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. व्यवसाय, चित्रपट, जाहिरात अशा विविध मार्गाने शाहरुखला उत्पन्न मिळते. बिझनेस टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार, वर्ष 2010 मध्ये शाहरुख खानचे उत्पन्न हे 1500 कोटी होते. त्यावेळी शाहरुख 10 मिनिटांच्या एका डान्स परफॉर्मेन्ससाठी 5 कोटी इतके मानधन घेत असत, आता 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.