नवी दिल्ली : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली तिच्या अभिनयासोबतच वैयक्तीक आयुष्यातील कुरबुरीमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या घटस्फोटानंतरच्या आयुष्यात ती सुखी नसल्याचं समोर आलं आहे. सध्या ती 'बेल्स पाल्सी' आणि हायपरटेन्शनसारख्या रोगानी त्रस्त असल्याचा खुलासा तिनं एका मुलाखतीत केला आहे.

अँजेलिना जोलीचा सप्टेंबर 2016 मध्ये घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतर ती अनंत अडचणींचा सामना करत असल्याचं तिनं या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. वॅनिटी फेअर या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, तिने आपल्या आजाराविषयी खुलासा केलाय.

2016 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर 'बेल्स पाल्सी' आणि हायपरटेंन्शनसारख्या आजारांनी ग्रस्त असल्याचं, तिनं यावेळी सांगितलंय. तसेच या रोगांमुळे तिची आईदेखील काळजी करत असल्याचं तिनं यावेळी सांगितलं.

या मुलाखतीत अँजेलिना सांगते की, ''जेव्हा तिने आपला पती ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती 'बेल्स पाल्सी' रोगाने ग्रस्त होती.'' तिच्यासाठी हा काळ अतिशय कठीण होता. पण तरीही त्यातून तिने स्वत: ला सावरलं, असंही तिनं यावेळी सांगितलंय.

'बेल्स प्लासी' हा असा आजार आहे, ज्यात चेहऱ्याच्या एका भागाला अर्धांगवायूचा झटका येतो. यामुळे चेहरा विद्रुप दिसू लागतो. सध्या या रोगातून ती बरी होत असून, उपचारामुळे तिचे केस ग्रे (राखाडी) रंगाचे झाले आहेत. तसेच त्वचा कोरडी झाली आहे.

दरम्यान, आता तिने या आजाराशी लढा देण्यासाठी जानजागृती मोहीम सुरु करणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केलंय. यापूर्वीही ब्रेस्ट कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होती. 2013 मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर तिने ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्रेस्ट इंप्लांटसारख्या रोगांवर जनजागृती मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला होता.