मुंबई : 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'गुलाबो सिताबो' सिनेमातील पहिला लूक समोर आला आहे. मोठा चष्मा, पांढरी दाढी आणि डोक्यावर मफलर असा बिग बींचा हा सर्वात हटके लूक आहे. या लूकमध्ये अमिताभ बच्चन यांना ओळखणं कठीण जात आहे.


बिग बींसोबतच आयुष्मान खुराणाची गुलाबो सिताबो सिनेमात मुख्य भूमिका असणार आहे. या सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. शूजित सरकार दिग्दर्शन करत असून हा सिनेमा पुढच्या वर्षी 24 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये बुधवारी ही शूटिंग सुरु झाली आहे. शूटिंगवर पोहोचण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. 'गेलो होतो असा, मात्र शूटिंगसाठी बाहेर आलो तर असा बनलो, काय बनलो हे आता सांगू शकत नाही', असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं होतं.





बिग बींनी आपल्या कारकिर्दित वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आणि त्या भूमिकांना योग्य न्याय दिला. 'गुलाबो सिताबो' या आगामी चित्रपटातील त्यांच्या नवीन  हटके लूकमुळे या चित्रपटाची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. मात्र त्यासाठी त्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.