मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ही जोडी तब्बल 26 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. गुजराती लेखक-दिग्दर्शक सौम्या जोशी यांच्या ‘102 नॉट आऊट’ या नाटकावर आधारित सिनेमा बनवला जात आहे.


या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर यांनी 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे अमिताभ हे यात ऋषी कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या बुधवारी या सिनेमाचं मुंबईत शूटिंग सुरु झालं असून, उमेश शुक्ला सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमातील अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा एक फोटो तरण आदर्श यांनी ट्वीट केला आहे.



विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर ही जोडी तब्बल 26 वर्षांनंतर एकाच सिनेमात दिसणार आहेत. शिवाय, ही जोडी पहिल्यांदाच गुजराती भूमिका साकारणार आहे.

बाप-लेकाच्या नात्यावर सिनेमाचं कथानक बेतलेलं आहे.

जुलै महिन्यापर्यंत शूटिंग पूर्ण होऊन, दोन दिग्गज कलाकारांचा एकत्रित सिनेमा नव्या पिढीला पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी याआधी अभिषेक बच्चन, असीन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक या कलाकारांना घेऊन ‘ऑल इज वेल’ नावाचा सिनेमा बनवला होता.