बाहुबली 2 हा पाकिस्तानात रिलीज झालेला पहिला डब केलेला प्रादेशिक चित्रपट आहे. पाकिस्तानात बाहुबली 2 हा 100 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटाच्या कथानकात हिंदू पुराण आणि परंपरांवर भर असला, तरी पाकमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाकिस्तानचे सिने वितरक अमजद रशिद यांनी म्हटलं आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एकही कट न सुचवता, 'यू' प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानात पहिल्या आठवड्याभरात सहा कोटींची कमाई करण्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. आमीर खानचा दंगलही पाकमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आमीरनेच त्यास मनाई केली.
बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.