Amitabh Bachchan-Jaya Bachchan : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात पॉवरफुल कपल आहे. दोघांनीही आपल्या नात्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र प्रत्येक अडचणीत त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे. दोघांचे लग्न झाले तेव्हा फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. दोघांचे लग्न होणार हे अनेकांना कळलेही नाही. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या लग्नाबद्दल लिहिले आहे आणि त्यांचे लग्न साधेपणाने का झाले हे स्पष्ट केले आहे.


अमिताभ-जयाच्या लग्नाच्या पाचच जण वऱ्हाडी...


'रेडिफ'वरील एका वृत्तानुसार, हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले की, अमिताभ आणि जया यांचे लग्न तातडीने झाले होते. त्यामुळे या विवाह सोहळ्यात फार मोजकीच मंडळी उपस्थित होती. हा विवाह सोहळा मलबार हिल्स येथील स्कायलार्क बिल्डिंगमधील सर्वात वरच्या मजल्यावरील अमिताभ-जया यांच्या मित्राच्या घरी पार पडला. या लग्नात पाचच जण वऱ्हाडी होते. यामध्ये एकजण म्हणजे संजय गांधी होते. जयाच्या लग्नावरून त्यांचे कुटुंबीय आनंदी असल्याचे वाटत नव्हते, असेही हरिवंशराय बच्चन यांनी म्हटले. 


जयाचे कुटुंबीय नाराज....


हरिवंशराय बच्चन यांनी पुढे म्हटले की, हे लग्न बंगाली पद्धतीने व्हावे अशी जयाच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्यावर आम्हाला कोणताही आक्षेप नव्हता. पहिला टप्पा वर-पूजा याचा होता. वराचा सन्मान करण्याचा होता. यामध्ये जयाच्या वडिलांना अमिताभ यांच्या घरी भेटवस्तू घेऊन यायचे होते आणि त्यासाठी एक छोटा कार्यक्रम आयोजित करायचा होता. मी नववधूसाठीदेखील हेच केले होते. मात्र, त्याच दरम्यान मला काही अनपेक्षित दिसून आले. जयाशिवाय, तिच्या कुटुंबात कोणालाही आनंद झालाय असे वाटत नव्हते.






अमिताभ-जयाच्या शेजाऱ्यांनाही नव्हती लग्नाची माहिती...


अमिताभ यांचा हळद समारंभ शांतपणे पार पडल्याचे त्यांनी नमूद केले होते. अमिताभ यांच्या लग्नाबद्दल शेजाऱ्यांनाही माहिती नव्हती, असे त्यांनी लिहिले आहे. त्यांनी लिहिले की, "जेव्हा शेजाऱ्यांनी विचारले की दिव्याच्या रोषणाईचा अर्थ काय आहे, तेव्हा आम्ही खोटे बोललो की, अमिताभ येथे एका चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. 


आमचं कुटुंब उद्धवस्त झालं... जयाच्या वडिलांनी व्यक्त केल्या भावना


हरिवंशराय बच्चन यांनी म्हटले की, लग्नाच्या वरातीचे अतिशय साधेपणाने स्वागत करण्यात आले. जेव्हा ते मंडपात पोहोचले तेव्हा त्यांना जया भादुरी वधूच्या वेशभूषेत दिसली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता, त्यावेळी ती अभिनय करत नव्हती.  सर्व लग्न विधी  संपल्यानंतर लग्नातील पाच पाहुणे जेवण करून घरी गेले. उरलेले लग्न कार्य उरकण्यासाठी दोन्ही कुटुंबेच उपस्थित होती. 


हरिवंशराय बच्चन यांनी सांगितले की, “आम्ही निघण्यापूर्वी, मी माझ्या नवीन सुनेच्या वडिलांना मिठी मारली आणि अमितसारखा जावई मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते देखील जयाबद्दल असेच काहीतरी म्हणतील अशी अपेक्षा होती. पण, त्यांनी  'माझे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे असे सांगितले. 


अमिताभ-जयाच्या लग्नाला 51 वर्ष... 


अमिताभ आणि जया बच्चन हे 3 जून 1973 रोजी विवाहबद्ध झाले. या दोघांच्या वैवाहिक आयुष्याला 51 वर्ष पूर्ण झाली आहेत.