Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. बिग बी (Big B) यांची लोकप्रियता फक्त देशापुरतीच मर्यादित नसून परदेशातही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही ते फिल्मी दुनियेत रमले आहेत. आजही ते वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. प्रकृतीच्या समस्यांवर मात करत ते नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालेत. अशातच आता तालिबानने (Taliban On Amitabh Bachchan) मेगास्टार अमिताभ बच्चन यांचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
तालिबानने केलं अमिताभ बच्चन यांचं कौतुक (Taliban Tweet For Amitabh Bachchan)
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत. आता तालिबान जनसंपर्क विभागाने (Taliban Public Relations Department) एक ट्वीट करत अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. बिग बींचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"अमिताभ बच्चन हे भारतीय अभिनेते आहेत".
तालिबानने पुढे लिहिलं आहे,"अफगाणी (Afghanistan) लोक अमिताभ बच्चन यांना पुरुषात्वाचे आदर्श प्रतीक मानतात. अमिताभ बच्चन यांचा अफगाणिस्तानाकडून सन्मान करण्यात आला आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. 1980 मध्ये ते अफगाणिस्तानात आले होते. त्यावेळी राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांनी अमिताभ बच्चन यांचा विशेष सन्मान केला. तालिबानचं हे ट्वीट व्हायरल होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमाचं अफगाणिस्तानात झालंय शूटिंग!
अमिताभ बच्चन यांचा 'खुदा गवाह' हा सिनेमा 1992 मध्ये रिलीज झाला. या सिनेमाच्या शूटिंगसाठी बिग बी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तान सध्या तालिबानच्या ताब्यात आहे. 'काबुल एक्सप्रेस'सह अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झालं आहे.
'खुदा गवाह' या सिनेमात अभिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवीदेखील मुख्य भूमिकेत होत्या. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या सिनेमातील गाण्यांना संगीत दिलं आहे. 8 मे 1992 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या सिनेमातील कलाकारांचा अभिनय, दिग्दर्शन, संगीत, पटकथा अशा सर्वच गोष्टींचं कौतुक झालं होतं. जगभरात या सिनेमाने 17.9 कोटींची कमाई केली. भारतासह अफगाणिस्तानातही या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला.
अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Amitabh Bachchan Upcoming Movies)
अमिताभ बच्चन यांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'कोर्टरून ड्रामा सेक्शन 84'मध्ये ते दिसणार आहेत. तसेच दीपिका पदुकोण आणि प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' या सिनेमातही ते झळकणार आहेत. टायगर श्रॉफ आणि कृती सेनन अभिनीत 'गणपत' सिनेमातही एका खास भूमिकेत ते दिसणार आहेत.
संबंधित बातम्या