Amitabh Bachchan Income :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे वयाच्या 81 व्या वर्षी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. काम करण्यातला त्यांचा उत्साह हा  तरुणांना लाजवेल असा आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे  रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावर, जाहिरात क्षेत्रातही सक्रीय आहेत. अमिताभ बच्चन यांनी मागील वर्षात किती कोटींची कमाई केली, याचा आकडा समोर आला आहे. त्यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यामुळे हा आकडा उघड झाला आहे. 


जया बच्चन या बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत जया बच्चन यांना समाजवादी पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरताना जया बच्चन यांच्या मागील वर्षातील उत्पन्नाचा आकडा समोर आला आहे. जया बच्चनच नव्हे तर अमिताभ बच्चन यांचीदेखील कमाई समोर आली आहे. 


राज्यसभा निवडणुकीसाठी जया बच्चन यांचा उमेदवारी अर्ज समोर आला. उमेदवारी अर्जात जया बच्चन यांनी आपला पत्ता मुंबईतील प्रतिक्षा बंगल्याचा दिला आहे. त्याशिवाय, जया यांनी आपल्यासोबत अमिताभ असे एकत्रित उत्पन्न नमूद केले आहे. 


उमेदवारी अर्जानुसार,  आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये जया बच्चन यांनी उत्पन्न एक कोटी 63 लाख 56 हजार 190 रुपये इतके असल्याचे नमूद केले. अमिताभ बच्चन यांचे उत्पन्न जया यांच्या तुलनेत अनेकपटीने अधिक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जया बच्चन यांची पती आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे उत्पन्न  273 कोटी 74 लाख 96 हजार 590 रुपये इतके आहे. जया बच्चन यांच्याजवळ 40.97 कोटींचे तर अमिताभ यांच्याकडे 54.77 कोटी रुपयांचे दागिने आहेत. 


किती कोटींची मालमत्ता?


बच्चन दाम्प्त्याकडे 800.49 कोटी रुपयांची जंगम आणि 200.14 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याचा अर्थ दोघांकडे मिळून 1000 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकी आहे. जया बच्चन यांच्याकडे  57 हजार रुपये आणि अमिताभ यांच्याकडे 12.75 लाख रुपये रोख रक्कम आहे. 


किती कोटींच्या मुदत ठेवी?


जया बच्चन यांच्याकडे 10.11 कोटींची एफडी आहे. तर, अमिताभ यांच्या नावाने 120 कोटींहून अधिक रुपयांची मुदत ठेव आहे. जया बच्चन यांनी 29.79 कोटी रुपये हे कर्ज म्हणून दिले आहेत. तर, अमिताभ बच्चन यांनी 359 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. 


वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांनी एकूण मालमत्ता जवळपास 3190 कोटींच्या घरात आहे. त्यांच्याकडे प्रतीक्षा आणि जलसासह एकूण चार बंगले आहेत. अयोध्या आणि दुबईत त्यांच्याजवळ मालमत्ता आहे.