National Film Award  Indira Gandhi Nargis Dutt :  देशात मानाचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या (National Film Award) श्रेणीत बदल करण्यात आले. त्यानुसार, आता चित्रपट पुरस्कार श्रेणीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांची नावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी स्थापन केलेल्या समितीने विविध श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानांसाठी 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यासह काही श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, सरकारने नेमलेल्या समितीने कोरोना महासाथी दरम्यान चर्चा केली होती. हे बदल करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. 


समितीने केलेल्या बदलानुसार, आता सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्काराचा उल्लेख केवळ दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलून राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म असे ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय, सामाजिक मूल्य  पर्यावरण संवर्धनासाठी संदेश देणाऱ्या या चित्रपटांना या श्रेणीत विलीन करण्यात येणार आहे. दिग्दर्शकाला स्वर्ण कमल आणि 3 लाख रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दरम्यान, इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळण्याबाबत नेमके कारण काय याबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नाही. 


समितीमध्ये कोणते सदस्य?


केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी खात्याच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर होत्या. तर, निर्माते प्रियदर्शन, विपुल शाह, सीबीएफसीचे प्रमुख प्रसून जोशी, सिनेमॅटोग्राफर एस. नल्लामुथू आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव पृथूल कुमार आदींचा समावेश होता. 


पुरस्काराच्या रोख रक्कमेत वाढ


दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी असणारे रोख पारितोषिक 10 लाखांवरून 15 लाख रुपये इतके करण्यात आले. याशिवाय विविध श्रेणीतील सुवर्ण कमळ पुरस्कारांची बक्षीस रक्कम तीन लाख रुपये आणि रौप्य कमळ विजेत्यांसाठी 2 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी वेगवेगळ्या श्रेणीनुसार बक्षिसाची रक्कम वेगवेगळी होती. 


इतर महत्त्वाची बातमी :