Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने (Malaika Arora) एका प्रकरणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे दाद मागितली आहे. मला प्रचंड संताप आला असून हे सगळं सहन करण्यापलिकडे आहे. आता प्रशासनाने कारवाई करावी असे विनंती मलायका अरोराने मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ठाण्यातील पाळीव प्राण्यांच्या क्लिनिकमध्ये श्वानांना मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मलायकाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मलायकाशिवाय, रितेश देशमुख, जुई गडकरी यांनीही संताप व्यक्त केला. 


ठाण्यातील आर मॉलजवळ असणाऱ्या वेटिक पेट क्लिनिकमध्ये एक संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी ग्रुमिंगसाठी आणण्यात आलेल्या एका श्वानाला क्लिनिकमधील दोन कर्मचाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. ही घटना 7 ते 8 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. 


सेलिब्रेटींनी केली कारवाईची मागणी... 


अभिनेत्री मलायकाने श्वानाला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याचे तिने म्हटले.  या केंद्रावरही कारवाई झाली पाहिजे असेही तिने म्हटले.




अभिनेता रितेश देशमुखने या व्हिडीओवर संताप व्यक्त केला. रितेश देशमुखने हा व्हिडीओ शेअर करत श्वानाला मारहाण करणाऱ्या  कर्मचाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. रितेशने इन्स्टा स्टोरीवर श्वानाच्या मारहाणीचा व्हिडीओ शेअर केला होता.



अभिनेत्री  जुई गडकरीही संतापली...


अभिनेत्री जुई गडकरीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत घडल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला. जुई गडकरीने म्हटले की, हा प्रकार संतापजनक आहे. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहू शकले नाही. श्वानाला मारहाण करणाऱ्याला देव नक्कीच शिक्षा करेल असेही जुईने म्हटले. आपल्या श्वानाला, प्राण्याला अशा क्लिनिकमध्ये एकटे पाठवू नका असे आवाहनही तिने केले. 



 


 






पोलिसांची कारवाई...


प्राणिप्रेमींनी  संताप व्यक्त केल्यानंतर आणि घडल्या प्रकाराची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ठाणे पोलिसांनी या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर, ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या वेटिक पेट क्लिनिकने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. हा प्रकार आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे क्लिनिकच्यावतीने सांगण्यात आले आहे.