पुणे : अभिनेता अक्षय कुमारने शेतकऱ्यांवरील प्रेम वेळोवेळी कृतीतून दाखवून दिलं आहे. याची प्रचिती पुण्याच्या मावळ तालुक्यात पुन्हा एकदा आली. लेकीची तहान भागवण्यासाठी अक्षय एका झोपडीत गेला आणि गूळ-भाकरीचा पाहुणचारही घेतला. विशेष म्हणजे झोपडीतील वृद्ध शेतकरी दाम्पत्याला आलेला पाहुणा इतका मोठा स्टार असल्याची पुसटशी कल्पना ही नव्हती.


दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी अक्षय पवना धरणाच्या बॅक वॉटरला कुटुंबासोबत आला होता. तेव्हा सकाळी साडे आठ वाजता अक्षय मुलीला घेऊन वॉकसाठी बाहेर पडला. धरणालगतच्या शिळिंब गावात ते पोहोचले, तेवढ्यात अक्षयच्या मुलीला तहान लागली. समोर एक झोपडी होती, त्यात वृद्ध दाम्पत्य होतं. अक्षय त्यांच्या परवानगीने घरात गेला, मुलीला पाणी पाजले.

दारात आलेल्याचा पाहुणचार करण्याची शेतकऱ्यांची परंपरा इथे अक्षयला अनुभवायला मिळाली. या ढमाले दाम्पत्याने अक्षयला चहा घेण्याचा आग्रह केला. पण अक्षयने चहाऐवजी गूळ-भाकरीचा आस्वाद घेतला. उदार मनाच्या ढमाले दाम्पत्याने अक्षयचा पाहुणचार केला. पण हा पाहुणा एक मोठा स्टार असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती.


अक्षयने ढमाले दाम्पत्यासोबत फोटो काढले आणि ट्वीट करुन या शेतकरी दाम्पत्यासोबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेकांनी ढमाले दाम्पत्याला याबाबत विचारणा केली. त्यानंतर आपल्या घरी बॉलिवूडचा मोठा स्टार येऊन गेल्याचं ढमाले दाम्पत्याला कळलं.