मुंबई : पाच कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटप्रकरणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीदरम्यान गाझियाबाद पोलिसांकडून अद्याप या अजामीनपात्र वॉरंटची प्रत मुंबई पोलिसांना प्राप्त झाली नसल्यामुळे हायकोर्टानं तूर्तास ही याचिका फेटाळून लावली आहे.
गाझियाबादमधील राजनगरमधील सतेंद्र त्यागी यांनी रेमोवर कोटयवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप करत तक्रार दिली आहे. रेमोच्या सांगण्यावरून त्यांनी साल 2013 मध्ये 'अमर मस्ड डाय' या सिनेमात पाच कोटी रुपये गुंतवले होते. चित्रपट रिलिजनंतर दुप्पट पैसे मिळवून देण्याचं आमिष रेमोने दिले होते. याबाबत रेमोकडे विचारणा केली असता रेमोने पैसे परत करण्यास नकार दिला. शिवाय त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही केला असे आरोप करत सतेंद्र त्यागी यांनी सिहानी गेट पोलीस ठाण्यात साल 2016 मध्ये रेमोविरोधात तक्रार दाखल केली होती. अखेर या प्रकरणी गाझियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान समंन्स बजावूनही रेमो गैरहजर राहिल्यामुळे रेमोविरोधात 23 ऑक्टोबर 2019 रोजी गाझियाबाद दंडाधिकारी न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या अटकेतून दिलासा मिळवण्यासाठी रेमो डिसूझाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
त्यावर सुट्टीकालीन कोर्टात न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, मुंबई पोलीसांना गाझियाबाद पोलीसांकडून अद्याप वॉरंट मिळालेले नाही. त्यामुळे तूर्तास रेमोवर कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकीलांनी कोर्टाला दिली त्याची दखल घेत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.
बॉलिवूडमधील दिग्दर्शक रेमो डिसूझाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
31 Oct 2019 08:58 PM (IST)
अजामीनपात्र वॉरंटची प्रत अद्याप मुंबई पोलीसांना मिळाली नसल्याने हायकोर्टाने रेमो डिसूझाची याचिका फेटाळून लावली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -