Prashant Damle Meet CM Eknath Shinde : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


एखाद्या राजकीय निवडणुकीप्रमाणेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं राजकारण रंगलं होतं.  अखेर या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी बाजी मारली असून नाट्यपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत दामलेंनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली आहे. 


प्रशांत दामले यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीदेखील भेट घेतली आहे. यावेळी अजित भुरे यांच्यासह नव्या कार्यकारिणीचे सदस्यदेखील उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दामले यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले म्हणाले होते,"आताचं सरकार हे ऐकणारे सरकार आहे". 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीदेखील प्रशांत दामले भेट घेणार आहेत. शरद पवार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त आहेत. त्यामुळे आता अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते शरद पवारांचीदेखील सदिच्छा भेट घेणार आहेत. 


नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चेसंदर्भात नाट्य परिषदेचे विश्वस्त असलेल्या शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी शरद पवार यांनी प्रशांत दामले आणि रंगकर्मी नाटक समूहाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्वीट केलं होतं,"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी  उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री श्री. उदय सामंत देखील उपस्थित होते".


कोणाले कोणते पद? 


अध्यक्ष- प्रशांत दामले
सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे
उपाध्यक्ष - नरेश गडेकर
उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर
खजिनदार- सतीश लोटके


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 11 जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यात सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संजय देसाई, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगेंचा कार्यकारिणीत समावेश आहे.


संबंधित बातम्या


Prashant Damle : 'आताचं सरकार हे ऐकणारे सरकार'; नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया