मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'वर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. भारत-पाक संबंध ताणले गेल्यानंतर आता पाकिस्तानकडूनही चुळबूळ सुरु झाली आहे.
सुशांतसिंग राजपूत याची मुख्य भूमिका असलेला 'एम एस धोनी..' हा चित्रपट येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतासोबतच हा सिनेमा पाकमध्ये रिलीज होणार होता. मात्र पाकिस्तानने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली. सिंधु नदीच्या पाणीवाटप करारावरुन आधीच भारताने कठोर भूमिका घेतली आहे. ‘रक्त और पानी साथ साथ नही बह सकते’, असे उद्गार मोदींनी काढले होते. त्यानंतर सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला चांगलंच खडसावलं होतं.
त्यानंतर मनसेनेही पाक कलाकारांना भारतातून ‘चले जाव’चा इशारा दिला होता. अभिनेता फवाद खान, माहिरा खान यांच्यासह अनेक पाकिस्तानी कलाकारांनी घरचा रस्ता धरला.