बंगळुरु : 80 च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणार्या आणि नंतर अनेक मालिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री श्री. प्रदा यांचे बंगळुरुमधील एम.एस. रमैया हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या 53 वर्षांच्या होत्या. श्री. प्रदा यांना श्वासोच्छवासाच्या अडचणीमुळे एमएस रमैया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सुमारे दोन आठवडे रूग्णालयात उपचार सुरु असताना श्री प्रदा यांची प्राणज्योत मालवली.
एबीपी न्यूजने श्री. प्रदा यांच्या निधनाबद्दल बंगळुरु येथे राहणारे त्यांचे भाऊ रूपेश नायडू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'माझ्या बहिणीला गेल्या वर्षी कोलन कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून तिला बंगळुरुतील कोलंबिया एशिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. केमोथेरपी घेण्यासाठी त्यांना दर 15 दिवसांनी रुग्णालयात जावे लागत असे. याच काळात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे श्री. प्रदा यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा स्टारर फिल्म 'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'चे शूटिंग पूर्ण केले होते.
श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्या नावावरुन 'श्री प्रदा'
अभिनेता गजेंद्र चौहान यांनी श्री प्रदा यांच्यासोबत बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांच्याबरोबर 1992 साली 'संसार' आणि काही वर्षांपूर्वी 'अधुरी हमरी कहानी' अशा मालिकांमध्ये काम केले आहे. एबीपी न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, 'श्री.प्रदाने अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. ती सुरुवातीपासूनच खूप मेहनती होती आणि तिने प्रत्येक भूमिका जोरदारपणे निभावली.
श्री प्रदा यांनी 80 आणि 90 च्या दशकात बी ग्रेड चित्रपटांमध्ये जास्त काम केलंय. श्री. प्रदा यांचे खरे नाव ईशा नायडू होते. गजेंद्र चौहान सांगतात की, त्यांचा पहिला चित्रपट 'दिलरुबा तांगेवाली'चे निर्माते मोहन टी. गियानी यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्री देवी आणि जया प्रदा यांच्या नावावरुन ईशाचे नाव 'श्री प्रदा' ठेवले. त्यानंतर श्री प्रदा यांचे पडद्यावरील नाव कायमचं राहिलं पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या.