मुंबई : सलमान खान, दिशा पाटनी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असेलला 'राधे' चित्रपट 13 मे रोजी थिएटर, झीप्लेक्ससह विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाआधी सलमान खान आणि झी एन्टरटेन्मेंटने मोठा निर्णय घेतला आहे. एबीपीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान फिल्म्स आणि झी एन्टरटेन्मेंटने 'राधे'च्या सर्व माध्यमांमधून होणाऱ्या कमाईचा एक भाग कोरोनाबाधितांसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी देण्याचं ठरवलं आहे.
सूत्रांनी एबीपीला सांगितलं की, 'राधे'च्या प्रदर्शनातून होणाऱ्या कमाईचा एक भाग ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणं खरेदी करण्यासाठी खर्च केला जाईल. 'राधे'च्या माध्यमातून GiveIndia फाऊंडेशन नावाच्या संस्थेला देणगी म्हणून काही रक्कम दिली जाईल, ज्यामधून ही उपकरणे खरेदी करुन, गरजू रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये वितरित केली जातील.
मात्र 'राधे'च्या कमाईतील किती टक्के भाग कोरोनाबाधित रुग्णांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाईल हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाच्या लढाईत 'राधे'कडून बऱ्यापैकी रक्कम दिली जाईल.
दरम्यान कोरोना महामारीच्या काळातच 'राधे' चित्रपट थिएटरसह झीप्लेक्सवर 'पे पर व्ह्यू' च्या आधारावर प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. याशिवाय एअरटेल, टाटा स्काय, डिश टीव्ही यांसारख्या तमाम डीटीएच प्लॅटफॉर्मवरही या चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होईल. या सर्व माध्यमातून चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ठराविक रक्कम मोजावी लागणार आहे.
सलमान खानने काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती की, हा चित्रपट 'ईद'ला थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल. परंतु देशातील बऱ्याच ठिकाणी पुन्हा एकदा लावलेल्या लॉकडाऊनमुळे काही थिएटरसह विविध प्लॅटफॉर्मवरही चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु लॉकडाऊनमुळे 'राधे' देशातील फारच कमी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट युरोप, आखाती देश, सिंगापूर, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह जगातील 40 देशांच्या चित्रपटगृहांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.