Kumar Sanu : भारतीय-हिंदी सिनेसृष्टीत 90 च्या दशकात कुमार सानू (Kumar Sanu) यांनी आपल्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली होती. 'चुरा के दिल मेरा', 'दो दिल मिल रहे', 'सोचेंगे तुम्हे प्यार','चोरी चोरी जब नजरें मिली' यांसारखी अनेक अविस्मरणीय गाणी त्यांनी गायली आहेत. कुमार सानू यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेली गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. मात्र, आता कुमार सानू फारशी गाणी गाताना दिसत नाही. एखाद्या कार्यक्रमात किंवा टीव्ही शोमध्ये कुमार सानू हे फक्त पाहुणे कलाकार म्हणून दिसतात.
2015 मध्ये आलेल्या 'दम लगा के हईशा' मधील 'दर्द करारा' हे कुमार सानूचे शेवटचे गाणे होते. 2018 मध्ये आलेल्या 'आंख मारे'च्या रिमेकमध्ये 'सिम्बा' चित्रपटासाठी एक गाणेही त्याने गायले होते. कुमार सानूने नुकतेच अमेरिकेतील एका शोमध्ये परफॉर्म केले. आता एका मुलाखतीदरम्यान गायकाने बॉलिवूडमध्ये कामाच्या संधी नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे.
आदर देतात पण काम नाही देत...
'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, कुमार सानू यांना सध्याच्या काळात तुमच्या आवाजात स्वरबद्ध झालेली गाणी येत नसल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना कुमार सानू यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "माझा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे, इंडस्ट्रीतील प्रत्येकजण माझा आदर करतो. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक माझा आदर करतात, माझ्यावर प्रेम करतात आणि माझी गाणीही ऐकतात. पण, हिंदी चित्रपटातील आणखी गाण्यांसाठी माझा आवाज का वापरत नाही, हे मला माहित नसल्याचेही कुमार सानूने सांगितले.
लोकांकडून मिळणारे प्रेम हे खरंच आहे?
हिंदी सिनेसृष्टीत लोकांकडून मिळणारे प्रेम हे खरंच मनातून आहे का, याबाबतही शंका असल्याचे कुमार सानू यांनी सांगितले. कुमार सानू यांनी सांगितले की, मी त्यांच्यासमोर असतो तेव्हा इंडस्ट्रीतील लोकांचे खूप प्रेम मिळते. पण हे प्रेम खरं आहे का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. पण, माझा आदर करतात हेदेखील सानू यांनी नमूद केले.
मी अजून गाऊ शकतो, तर संधी का नाही?
कुमार सानू यांनी सांगितले की, "जर मी गाणे गाऊ शकतो, तर मला गाणं गायला का लावत नाही? ते (निर्माते) याचा विचार का करत नाहीत? मी शो करत आहे, माझे फॅन फॉलोइंग आहे. मी जिथे जातो त्या शो ला चांगला प्रतिसाद मिळतो. या वर्षी मी आणखी एक लाईव्ह शो घेऊन येत आहे. लोकांचा मला प्रतिसाद आहे हे जर इंडस्ट्रीतील लोकांना समजत नसेल तर ते त्यांचे दुर्दैव आहे, असेही कुमार सानू यांनी सांगितले.
90 चं दशक कुमार सानू यांनी गाजवलं...
1990 च्या दशकात कुमार सानू यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. सलग पाच वर्षे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पटकावला होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील 'तुझे देखा तो', 'मेरा दिल भी कितना पागल है' सारखी गाणी गायली आहेत. 'साजन' आणि 'साजन'. '1942: एक प्रेम कथा' मधील 'एक लडकी को देखा' सारखी सदाबहार हिट गाणी गायली आहेत.