मुंबई : मसान, संजू, राझी, 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' यासारख्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका करुन प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालेला अभिनेता विकी कौशलला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर'- पाथब्रेकिंग पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या सन्मानाला उत्तर देताना विकी कौशलने मराठीतून भाषणाला सुरुवात केली.

महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मला महाराष्ट्राचा अभिमान आहे, असं म्हणत विकीने बोलायला सुरुवात केली. युनिफॉर्म घातल्यावर तुमची हाडं ठिकाण्यावर येतात, तुमची चाल बदलते आणि जबाबदारीची जाणीव होते, असं म्हणत विकीने 'उरी' चित्रपटाच्या निमित्ताने झालेली जाणीव सांगितली.

VIDEO | लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर : अभिनेता विकी कौशलचं भाषण | मुंबई | एबीपी माझा



पटियाला केंटमध्ये शूटिंग करतानाचा अनुभव विकीने शेअर केला. हाथी रेजिमेंटने आम्हाला डिनरसाठी आमंत्रित केलं होतं. आम्ही जवळपास रात्री दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी विचारलं उद्याचा काय प्लॅन आहे. मी म्हटलं, खूप दिवसांनी मला सुट्टी मिळाली आहे, तर आराम करणार आहे. मी त्यांना विचारलं, तुमचं काय? तर ते म्हणाले काही नाही. सकाळी पाच वाजता उठायचं, 25 किलोमीटर धावायचं, मग बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. मी ओशाळून म्हटलं, अॅम सॉरी, मला आधी निघायला हवं होतं. तर ते हसतमुखाने म्हणाले, काहीच हरकत नाही. आम्ही 'आज' आजच्यासारखा जगतो, कोणास ठावूक उद्या आमचा फोटो कधी वर्तमानपत्रात येईल. त्यांचं हे वाक्य मी कधीच विसरु शकणार नाही, असं विकी कौशल म्हणाला. 'सर्व्हिस बिफोर सेल्फ' हे ब्रीदवाक्य आपले जवान मनापासून पाळतात, असंही विकी म्हणाला.

उरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 230 कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला. याबद्दल विकीने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले. हे यश अनपेक्षित आहे. हा चित्रपट आपल्या सैन्यदलासाठी एक मानवंदना होता, असं विकीने सांगितलं.

पुलवामा हल्ला ही आपल्यासाठी वैयक्तिक हानी असल्याची भावनाही विकी कौशलने व्यक्त केली. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला गमावल्याची भावना होती, असं विकीने सांगितलं. आपल्या मनात दुःख आणि आक्रोश आहे. दहशतवादाला कसं प्रत्युत्तर द्यावं आणि या प्रश्नावर तोडगा कसा काढता येईल, याचं उत्तर जाणून घ्यायचं असल्याचंही विकी म्हणाला. घरी बसून यावर बोलणं खूप सोपं आहे, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्यांना ते घेऊ द्यात, ते आपल्या भल्यासाठीच असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवूया, दहशतवादाला एकतेने उत्तर देऊया, असं आवाहनही विकी कौशलने केलं. 'हाऊज् द जोश'ची घोषणा देत विकीने भाषणाची सांगता केली.