मुंबई : अभिनेता अजय देवगन याने त्याची मुलगी न्यासाला ट्रोल केल्याबद्दल ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. 'मी आणि काजोल कलाकार आहोत, आमच्याबद्दल तुमचे मत द्या, आमच्या मुलांबद्दल नाही', अशा शब्दात त्याने ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. त्याचा आगामी सिनेमा 'टोटल धमाल'च्या प्रमोशनादरम्यान तो बोलत होता.

काही दिवसांपूर्वी अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा हिला तिच्या वर्णावरुन सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आलं होतं. मुंबई विमानतळाबाहेरचा काजोल-न्यासाचा एक फोटो काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. या फोटोवर काही ट्रोलर्सनी कमेंट केल्या होत्या.

कोणी न्यासाच्या रंगावरुन भाष्य केलं, तर कोणी तिला प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला. ज्याप्रमाणे काजोलने स्वतःचा वर्ण उजळला, त्याप्रमाणे तिने आपल्या लेकीलाही मार्गदर्शन करावं, असंही कोणी सुचवलं. अशा भाषेत ट्रोलर्सनी निसाला वर्णभेदी ट्रोल केलं होतं.

यावर बोलताना अजय देवगन म्हणाला, एखाद्याबद्दल मत कायम करणं चुकीचं आहे. जर मी एखाद्याबद्दल माझे मत दिले तर त्याला नक्कीच वाईट वाटेल. तसंच माझ्या मुलांनाही वाईट वाटतं, असं तो म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, अशे लोक माझ्यासाठी जास्त महत्वाचे नाहीत, मात्र जेंव्हा विचार केला तर मुलांसाठी वाईट वाटतं. न्यासालाही पूर्वी या ट्रोलिंगचं वाईट वाटायचं, मात्र ती आता या गोष्टींकडे दु्र्लक्ष करते, असं तो म्हणाला.