पुणे : बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते आपल्या साध्या वागण्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेतात. अशातच बॉलिवूडच्या जग्गू दादाचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या एका मुलीच्या कुटुंबातील सदस्याचं निधन झाल्याची वार्ता जॅकी श्रॉफ यांना मिळाली. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी थेट तिच्या घरी जाऊन तिचं आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 


बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या घरात घरकाम करणाऱ्या दीपाली तुपेच्या आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. हे वृत्त समजताच जॅकी श्रॉफ यांनी थेट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवनानगरला जाऊन दिपाली ठाकर आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. वयाची शंभरी ओलांडलेल्या दिपालीची आजीचं म्हणजेच, तान्हाबाई ठाकर यांच्या निधनाचं वृत्त समजलं आणि जॅकी श्रॉफ यांनी थेट दिपालीचं घर गाठलं. त्यावेळी कोणताही बडेजावपणा न करता चक्क जमिनीवर बसून त्यांनी दिपालीच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. तसेच दिपालीच्या निधन झालेल्या आजींबाबतही विचारपूस केली. 


मिळालेल्या माहितीनुसार, मावळमध्ये राहणाऱ्या दिपाली तुपेच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचं  वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं. तान्हाबाई ठाकर यांची नात गेल्या अनेक दिवसांपासून जॅक श्रॉफ यांच्या मुंबईतील घरात घरकाम करते. आजीच्या निधनानं दिपाली अस्वस्थ होती. आजीच्या निधनाबाबत माहिती मिळताच दिपाली पुण्याला पोहोचली. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी यासंदर्भात माहिती मिळाली. त्यांनी थेट मावळ गाठलं आणि दिपाली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. 


दरम्यान, जॅकी श्रॉफ यांच्या मनाचा मोठेपणा पहिल्यांदा पाहायला मिळाला नाही. जॅकी श्रॉफ यांचा जन्म एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला, तसेच त्यांचं बालपण चाळीत गेल्याचं अनेकदा ते सांगतात. त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव असल्याचंही अनेकदा त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. जॅकी श्रॉफ यांचा एक बंगला मावळमधील चंदखेड येथे आहे. तसेच अनेकदा सुट्टी घालवण्यासाठी ते मुंबईत येत असतात. चंदखेडमधील गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते इथे फिरण्यासाठी नक्की येतात, पण नेहमीच गावकऱ्यांच्या मदतीसाठी तयार असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PHOTO : जॅकी श्रॉफचा साधेपणा, सहकाऱ्याचं सांत्वन करायला मावळमध्ये पोहोचले जॅकीदा