Bollywood News | बॉलिवूड अॅक्ट्रेस परिणीती चोप्रा हिच्या आगामी 'सायना' सिनेमाचं  पहिलं गाण लॉन्च झालं आहे. या गाण्यात परिणीती सोबत अभिनेता आणि लेखक मानव कौल देखील दिसत आहे. या सिनेमात परिणीती भारताची स्टार बॅडमिंटरपटू सायना नेहवाल हिची भूमिका साकारत आहे. तर मानव सायनाच्या कोचच्या भूमिकेत आहे. 


सायना सिनेमातील पहिल्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. टी सीरिजच्या बॅनर खाली हे गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. अमाल मलिकने हे गाणं गायलं आहे. 



बॅडमिंटन क्षेत्रात सायनाची कामगिरी, आतापर्यंत तिच्या वाट्याला आलेले यशापयशाचे क्षण, या प्रवासात तिच्या पालकांपासून ते अगदी प्रशिक्षकापर्यंतची भूमिका या सर्वच गोष्टींवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्यात येणार आहे. खुद्द परिणीतीनं या चित्रपटासाठी कमालीची मेहनत घेतली, अनेक प्रशिक्षण सत्रांमध्ये ती सहभागी झाली, एका खेळाडूचं जीवन ती या चित्रपटाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं जगली.


दरम्यान, हा चित्रपट होळीच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट प्रेक्षकांसाठी 26 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार आहे. 'सायना' चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं आहे. चित्रपटाचं संगीत अमाल मलिक यांनी दिलं आहे. यापूर्वी अमाल मलिक यांनी 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्येही संगीत दिलं होतं.