मुंबई : मागील काही दिवसांपासून देशात कोरोना लसीकरण प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्यानं सुरु झालेल्या या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले असून, त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठीचं एक पाऊल पुढे टाकलं आहे. कलाविश्वातील बऱ्याच सेलिब्रिटींनीसुद्धा या विषाणूशी लढण्यासाठी म्हणून कोरोनाची लस घेतली आहे. पण, बिग बी अमिताभ बच्चन यांनी मात्र अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. बिग बी, हे स्वत: कोरोनावर मात करणाऱ्यांपैकी एक आहेत. पण, असं असतानाही त्यांनी अद्यापही लस घेतली नसल्याची बाब अनेकांनाच विचार करण्य़ास भाग पाडत आहे. 

Continues below advertisement


खुद्द बिग बींनीच असे संकेत दिले आहेत की, डोळ्यांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया पूर्णपणे बरी झाल्यानंतरच ते कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या डोळ्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेबाबत माहिती देत हळूहळू आपण यातून सावरत असल्याचं म्हटलं होतं. मागील आठवड्यातच त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली. 


अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. त्यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं, 'व्हायरस एका वेगळ्याच प्रकारची भीती दाखवू लागला आहे. लसीकरण अनिवार्य झालं आहे आणि लवकरच मलाही रांगेत उभं राहावं लागणार आहे. पण, जेव्हा डोळा बरा होईल तेव्हा... तोपर्यंत हे जग विचित्रच आहे'.


Maharashtra Corona Cases Update |  राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा चढता आलेख; आज आढळले इतके रुग्ण... 


आतापर्यंत मनोरंजन विश्वात अनेक कलाकारंनी कोरोनाची लस घेतली आहे. शर्मिला टागोर, धर्मेंद्र, जितेंद्र या कलाकारांचा यात समावेश आहे. त्यातच आता बिग बी अमिताभ बच्चन नेमकी ही कोरोना लस केव्हा घेणार याकडेच चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.