मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिकांना न्याय देत आपल्या अभिनय कारकिर्दीत पावलोपावली प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या नीना गुप्ता यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांच्या विश्वात सर्वच वयोगटातील प्रेक्षकांचा समावेश आहे. तरुणाईतही त्यांना तितकीच लोकप्रियता प्राप्त आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बधाई हो' या चित्रपटानं नीना गुप्ता यांच्या लोकप्रियतेत विशेष भर टाकली. 


सेलिब्रिटींच्या जीवनात आलेल्या लोकप्रियतेसोबतच चाहत्यांमध्ये त्यांच्या कामासमवेत खासगी जीवनाविषयी असणाऱी कुतूहलाची भावनाही वाढत जाते. नीना गुप्ता यांच्या बाबतीतही असंच झालं. कलाविश्वातील कामगिरीसोबतच त्यांच्या खासगी जीवनाविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा झाल्या. मुळात खुद्द त्यांनीही एक प्रकारची पारदर्शकता राखली. 


नीना गुप्ता या वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील प्रख्यात खेळाडू सर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांनी रिचर्ड्स यांच्याशी लग्न केलं नाही, पण या नात्यातून नीना गुप्ता यांना एक मुलगीही झाली. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता ही नीना यांचीच मुलगी. खासगी जीवनात फार मोठे निर्णय तितक्याच ताकदीने घेणाऱ्या नीना यांना एकल मातृत्त्वाची जबाबदारी सांभाळणं तितकं सोपं गेलं नाही. पैसे, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याअभावी एक काळ व्यतीत करणाऱ्या या अभिनेत्रीनं बऱ्याच अडचणींचाही सामना केला.


साधारण वर्षभरापूर्वी नीना गुप्ता यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्या महिला चाहत्यांना मोलाचा सल्ला देताना दिसल्या. कधीही विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू नका, असा सूर त्यांनी यात आळवला होता. त्यांनी यासाठी एक काल्पनिक कथाही ऐकवली आणि अखेरीस स्वत:चं उदाहरण देत त्यांनी आपल्या अनुभवांतून तरी इतरांनी शिकावं असा आग्रह केला. 




IN PICS | जागतिक आनंदी देशांच्या क्रमवारीत भारताचा 139 वा क्रमांक ; पाहा या यादीत नेमक्या कोणत्या देशांचा समावेश आहे


विवाहित पुरुषाशी असणाऱ्या नात्यामध्ये महिलेचं गुंतत जाणं, त्याच्या वैवाहित नात्यातून बाहेर पडण्यासाठी आग्रही होणं, प्रेमात आकंठ बुडून जाणं आणि अखेरीस त्या व्यक्तीचा नकार पचवणं किती वेदनादायक असतं हे त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं. अखेरीस, तुम्ही विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडू नका. मी हे आधीच करुन झाले आणि परिस्थितीला सामोरीही गेले. त्यामुळंच मी सांगतेय असं काही करु नका असं म्हणत आपुलकीचा सल्ला महिला चाहत्यांना दिला.