मुंबई : साबरमती ट्रेन (Sabarmati Train) दुर्घटनेवर आधारित चित्रपट  'ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरेसी गोधरा' (Accident Or Conspiracy Godhra) चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रदर्शित (Trailer) झाला आहे. 22 वर्षांपूर्वी घडलेल्या साबरमती ट्रेन दुर्घटनेवर आधारित या चित्रपटाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 12 जुलै रोजी 'ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरेसी गोधरा' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी, 25 जून रोजी या चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अलिकडे रिअल लाईफ स्टोरीकडे प्रेक्षकांचा कल वाढलेल पाहायला मिळत आहे. सत्य घटनावर आधारित फिल्म्स प्रेक्षकांना जास्त प्रभावित करतात. हा चित्रपट देखील सत्य उलगडणार असल्याचा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आहे.


ॲक्सिडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर


ओम त्रिनेत्र फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात रणवीर शौरी, मनोज जोशी, हितू कनोडिया, देनिशा घुमरा, अक्षिता नामदेव, गणेश यादव आणि राजीव सुर्ती यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट नानावटी मेहता आयोगाच्या अहवालावर आधारित आहे. या आगोगाला या घटनेची चौकशी करण्याचे काम देण्यात आले होते. एका आयोगाच्या अहवालावर आधारित एखाद्या घटनेचे सत्य प्रेक्षकांसमोर घेऊन येणारा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. एम.के. शिवाक्ष हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 


कसा आहे 'ॲक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरेसी गोधरा' चित्रपटाचा ट्रेलर?


आगीमध्ये जळणाऱ्या निरपराध लोकांच्या किंकाळण्याच्या आवाजाने ट्रेलरची सुरुवात होते, वकिलाच्या भूमिकेत रणवीर शौरी दिसत आहेत. साबरमती ट्रेन जाळली गेली नाही तर जळत ठेवली गेली, असं वकील सांगतो. बाहेर एक महिला मीडियाला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारते, "हजारो लोकांची हत्या, गँगरेप हे षडयंत्र नाही तर दुसरे काय आहे". रणवीर शौरी आपले मत ठामपणे मांडताना म्हणतो की ,"प्रशासन आपला बेजबाबदार पणा  लपवण्यासाठी फक्त एकच गोष्ट उगाळत आहे. जेव्हा हल्ला झाला तेव्हा आरपीएफ कुठे होती? फायरब्रिगेड कुठे होती ? साबरमती ट्रेनला असे जळत ठेवणे हा एक कट होता. ह्या वक्तव्याला विरोध करत वकील मनोज जोशी आपले मत मांडत असताना ट्रेन च्या आवाजा मध्ये त्यांचा आवाज विरळ होऊन जातो. त्यात एक मनुष्य हा प्रश्न विचारतो की साबरमती ट्रेनच का?


ट्रेलरच्या दुसऱ्या भागात अतिशय भावूक दृश्यं दिसत आहेत, एक मनुष्य आपल्या पत्नीला ट्रेनमध्ये सोडण्यासाठी आला आहे, अभिनेत्री डेनिशा घुमरा म्हणते, "तुम्ही असा निरोप घेत आहात की, मी पुन्हा न येण्यासाठी कायमची जात आहे." ट्रेलरच्या शेवटी, लोकप्रिय गुजराती अभिनेता हितू कनोडियाचे पात्र एक मोठा प्रश्न उपस्थित करत आहे की, 59 लोक ह्या ट्रेन अपघातात मारली गेली, त्यापैकी एकाच नाव तरी माहित आहे का? आणि  जळणाऱ्या निष्पाप लोकांच्या किंकाळ्याने चित्रपटाचा ट्रेलर संपतो. 


टीझरपासूनच चित्रपटाची प्रतीक्षा


'अपघात किंवा कॉन्स्पिरेसी, गोधरा' हा चित्रपट भीषण ट्रेन हल्ल्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर बनविण्यात आला आहे . आजपर्यंत न्याय न मिळालेल्या दुःखद भूतकाळाबद्दल प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पडणाऱ्या चित्रपटाचा टीझर समोर येताच चर्चा  सुरू झाली होती. सेन्सरबाबतच्या विविध अडथळ्यांमुळेही हा चित्रपट चर्चेत आला आहे. सेन्सर बोर्डाच्या विविध टप्प्यांवर चाचण्या घेण्यासाठी निर्मात्यांना बराच काळ वाट पाहावी लागली. पण आता मात्र  या चित्रपटाला सेन्सर प्रमाणपत्र मिळाले असून 12 जुलै रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.


गोधरा घटनेमागील सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न


दिग्दर्शक एम.के. शिवाक्ष यांनी म्हटलं आहे की, 'गोधरा घटनेमागील सत्य सर्वांसमोर आणणे हाच माझा मुख्य उद्देश आहे, हा चित्रपट कोणत्याही जाती किंवा पंथाला टार्गेट करत नाही आहे तर एका घटनेचे सत्य उलगडून दाखवत आहे, ज्याचा वापर काही लोकांनी स्वत:च्या फायद्यासाठी केला आणि आजवर लोकांची दिशाभूल करण्यात आली.'