Aamir Khan :  काही वर्षांपूर्वी आलेला आमिर खानचा (Aamir Khan ) 'तारे जमीन पर' (Taare Zameen Par) या सिनेमा हा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. सिनेमाची गोष्टच इतकी भावते की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्याच डोळ्यात आपसूकच पाणी येतं. गहन आशय असणारा हा सिनेमा टचकन डोळ्यात पाणी आणतो, विचार करायला भाग पाडतो आणि प्रेक्षक म्हणून निखळ मनोरंजनही करतो. दरम्यान आमिर खानच्या तारे जमीन पर या सिनेमा नंतर त्याने काहीच दिवसांपूर्वी सितारे जमीन पर या त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती.                    


आमिर खानच्या सितारे जमीन पर या सिनेमात अभिनेत्री जेनेलिया देशमुखही झळकणार आहे. पण या सिनेमाची गोष्ट काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली होती. आमिर खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिनेमाच्या कथेविषयी भाष्य केलं आहे. तसेच सिनेमाचा आशय काय असणार हे देखील आमिरने सांगितलं आहे. 


कसा असणार आमिर खानचा सितारे जमीन पर?


हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमिरने म्हटलं की, सितारे जमीन पर ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर तारे जमीन पर सिनेमा हा भावनिक होता, या सिनेमाने तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. पण सितारे जमीन पर हा सिनेमा तुम्हाला खळखळून हसवेल. सिनेमाचा आशय सारखाच आहे. पण सिनेमाचा साचा हा भावनिक नसून तो हसवणारा आहे. 


पुढे त्याने म्हटलं की, हा सिनेमा अनेकदृष्ट्या तारे जमीन पर सिनेमाच्या खूप पुढे असणार असल्याचं मला वाटतंय. तारे जमीन पर सिनेमात इशानला माझ्या भूमिकेने मदत केली होती. पण सितारे जमीन परमध्ये 10 अशी लोकं आहेत, ज्यांना काही अडचणी आहेत,  ते माझ्या भूमिकेला मदत करतात. हा एक खूप मोठा बदल आहे. त्यामुळे ही गोष्ट प्रेक्षकांनाही आवडेल अशी मला आशा आहे. 


आमिर खानच्या सितारे जमीन पर या सिनेमाची प्रेक्षकांनाही खूप उत्सुकता आहे. त्यामुळे हा सिनेमाही प्रेक्षकांना भावणार का हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल. तसेच यामध्ये आमिरसोबत कोणते कलाकार झळकणार याचीही उत्सुकता आहे. 


ही बातमी वाचा : 


Tharla Tar Mag : नात्याची नवी सुरुवात होणार, मधूभाऊंच्या येण्याने सायली-अर्जुनमधला दुरावा प्रेमाच्या मिठीने संपणार