Tharla Tar Mag : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये मधूभाऊंना अटक करण्यात आली होती. पण आता अखेर मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यात अर्जुनला यश आलं आहे. मधूभाऊंच्या केसमुळे सायली आणि अर्जुन एकमेकांच्या जवळ आले होते. पण आता मधूभाऊंची केस अर्जुन लांबणीवर टाकत असल्याचा गैरसमज सायलीचा झाला होता. सायलीचा हा गैरसमज दूर करण्याचा अर्जुन बराच प्रयत्न करत होता. त्याच प्रयत्नांना यश मिळत कोर्टानेही मधूभाऊंचा जामीन मंजूर केला आहे.
सायलीला दिवाळीच्याच दिवशी अर्जुन ही खास भेट देतो. मधूभाऊंना घरी आल्याचं पाहून सायलीचेही अश्रू थांबत नाही. ती मधूभांऊंची सुटका केल्याचं कळताच अर्जुनला घट्ट मिठी मारते. त्यामुळे मधूभाऊंच्या येण्याने अर्जुन आणि सायलीमधले सगळे गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
प्रेमाच्या मिठीने दुरावा दूर होणार
मधूभाऊ जेव्हा सायलीला भेटतात तेव्हा ते सायलीला सांगतात की, जावाईबापूंनी मला जामीन मिळवून दिला आहे. त्यावर सायली देखील खूप खूश होते आणि आनंदाने ती अर्जुनला प्रेमाची मिठी मारते. यामुळे सायली आणि अर्जुन या दोघांमधले वादही संपणार आहेत. तसेच दुसरीकडे मधूभाऊंची सुटका झाल्याने महिपत, साक्षी, प्रिया आणि नागराज हे मात्र बरेच काळजीत पडलेत. कारण मधूभाऊंना जामीन मिळाल्यानंतर आता त्यांनी खेळलेला डाव पूर्णपणे फसला आहे.
अर्जुन मिळवून देणार मधूभाऊंना जामीन
मधूभाऊंना जामीन मिळवून देण्यासाठी कोर्टात युक्तिवाद करताना अर्जुनच्या डोळ्यातही पाणी येतं. तो कोर्टाला सांगतो की,मधूभाऊ रोज पोलिसांच्या संपर्कात राहतील, हवं तर रोज पोलीस स्थानकात हजेरी देखील देतील, या गोष्टीची खात्री त्यांचा वकील म्हणून मी कोर्टाला देतो.पण आता मी सादर केलेल्या कारणांमुळे मधूभाऊंना जामीन मिळायलाच हवा. त्यानंतर कोर्टानेही सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे मधूभाऊंना जामीन मंजूर केला.
ही बातमी वाचा :
Tharla Tar Mag : अर्जुनचे प्रयत्न अन् सायलीची प्रार्थना, सुभेदारांची दिवाळी सहकुटुंब साजरी होणार