Ira Khan Nupur Shikhare : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) लग्नबंधनात अडकली आहे. मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) कोर्ट मॅरेज करत तिने लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आमिर खानची लाडकी लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे लग्नबंधनात अडकले आहेत. आमिरचं संपूर्ण कुटुंब या आनंदात सहभागी झालं होतं. आयरा आणि नुपूर यांचं रजिस्टर मॅरेज झालं असून येत्या 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत.
उदयपूरमध्ये होणार शाही विवाहसोहळा
आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रजिस्टर मॅरेज केलं आहे. रजिस्टर मॅरेजनंतर आता 10 जानेवारी 2023 रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात ते लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूरमध्ये होणाऱ्या या शाही विवाहसोहळ्याची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे. त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूडकर आणि मित्रमंडळींसाठी एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
नुपूरच्या 'त्या' लूकने वेधलं लक्ष (Nupur Shikhare Look)
आयरा आणि नुपूर यांच्या लग्नासाठी खान आणि शिखरे कुटुंबीय उपस्थित होते. लग्नादरम्यान नववधू आयरा खूपच देखणी दिसत होती. मात्र नुपूरच्या हटके लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नुपूरने लग्नात हाफ पँट आणि टी-शर्ट परिधान केला होता. याच लूकमध्ये त्याने आयरासोबत लग्नगाठ बांधली. त्यामुळे नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
नुपूर हा सेलिब्रिटी जिम ट्रेनर आहे. त्यामुळे जिमच्या कपड्यांमध्ये धावत आणि जॉगिंग करत मित्रांसोबत लग्नाची मिरवणूक घेऊन तो ताज लँड्स एंडच्या बाहेर पोहोचला होता. दरम्यान ढोल-ताशांच्या तालावर त्याने चांगलाच ठेका धरला. त्याचे डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमिरच्या लेकीच्या लग्नात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. आता उदयपूरमध्ये होणाऱ्या शाही विवाहसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात आहे. आयरा आणि नुपूर 2020 पासून एकमेकांना डेट करत होते.
संबंधित बातम्या