68th National Film Awards 2022 : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (68th National Film Awards 2022) नुकतीच घोषणा झाली आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. यात अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'तान्हाजी' (Tanhaji) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला जाहीर झाला आहे. 


'तान्हाजी' सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ओम राऊत आनंद व्यक्त करत म्हणाला,'तान्हाजी' या सिनेमाला दोन पुरस्कार जाहीर झाल्याचा खूप आनंद होत आहे. आपल्या सिनेमाला पुरस्कार मिळणं हे खूप अभिमानास्पद आहे. शिवरांच्या मावळ्याची गाथा रुपेरी पडद्यावर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. बॉक्स ऑफिसवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता".  


100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा 'तान्हाजी'


बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. हा सिनेमा देशभरातील सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला. हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला होता. 


'तान्हाजी' सिनेमाचे कथानक काय?


'तान्हाजी' हा सिनेमा हिंदवी स्वराज्याचे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची कथा सादर करतो. कोंढाणा काबीज करण्यासाठी आपल्या घरातलं लग्न लांबणीवर टाकणारे, शिवरायांच्या शब्दासाठी, स्वराज्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असणारे लढवय्ये तानाजी मालुसरे युद्धकलेत निपुण होतेच पण डाव प्रतिडाव आखण्यातही तरबेज होते. अशा अनेक गोष्टी 'तान्हाजी' या सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत. 



संबंधित बातम्या


National Film Awards 2022 : 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा; राहुल देशपांडे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक


68th National Film Awards : 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा होणार! पुरस्कारांसाठी ‘या’ चित्रपटांची नावे चर्चेत