Shamshera Movie Review : यशराज स्टुडियो चित्रपटाची निर्मिती करताना सशक्त कथानकावर लक्ष देण्याऐवजी फक्त भपकेबाजीवरच लक्ष केंद्रित करीत असल्याने त्यांचे अती भव्य, महत्वाकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या आमिर खान आणि अमिताभ बच्चन अभिनीत 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान'ने याची सुरुवात झाली होती. हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतरही यशराज सुधारलेले दिसत नाही हे शमशेराच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.


साऊथच्या बाहुबली आणि आरआरआरचे गारुड अजूनही भारतीय प्रेक्षकांच्या मनावरून उतरलेले नाही. या चित्रपटांची चर्चा अजूनही सुरु असते. असे असताना शमशेरामध्ये त्याची काहीशी नक्कल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही चित्रपटांची छाप 'शमशेरा'वर स्पष्टपणे दिसून येते.


चित्रपटाची पार्श्वभूमी भारत पारतंत्र्यांत असतानाची आहे. खमेरान नावाच्या लढाऊ आदिवासी जमातीची कथा आणि संघर्ष सांगणारा हा चित्रपट आहे. खमेरान जंगलात आपले शांत जीवन जगत असतात पण काही व्यापारी येतात आणि त्यांच्या जमीनी हडप करून त्यांना देशोधडीला लावतात. तेव्हा शमशेराच्या (रणबीर कपूर) नेतृत्वाखाली खमेरानी दरोडे टाकू लागतात. शमशेरा आणि त्याच्या टोळीला अटक करण्यासाठी इंग्रज जंग जंग पछाडत असतात. शुद्ध सिंह (संजय दत्त) शमशेराला फसवून त्याच्या संपूर्ण जमातीसह काजा किल्ल्यात बंदी बनवतो. बंदीवासातून सुटायचे असेल तर 10 हजार तोळे सोन्याची मागणी इंग्रज करतात. शमशेर ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु करतो. पण अयशस्वी होतो आणि त्याचा मृत्यूही होतो. त्याचा मुलगा बल्ली (रणबीर कपूर) 25 वर्षानंतर आईसह संपूर्ण जमातील काजा किल्ल्यातून कसा मुक्त करतो आणि शुद्ध सिंहचा कसा खात्मा करतो त्याची कथा म्हणजे 'शमशेरा'.   


रणबीर कपूरने 2009 मध्ये यशराजसोबत 'रॉकेट सिंह- सेल्समन ऑफ द इयर' चित्रपट केला होता. त्यानंतर जवळ जवळ एक दशकानंतर रणबीर आणि यशराज एकत्र आले. रणबीरने शमशेरा आणि बल्लीची भूमिका अत्यंत उत्कृष्टपणे साकारली आहे. तो दोन्ही भूमिकांमध्ये सूट झालेला आहे. स्टारपणा जाणवू न देता त्याने अभिनय केला आहे पण कथेतच दम नसल्याने आणि दिग्दर्शनही चांगले नसल्याने त्याची मेहनत वाया गेल्याचे स्पष्टपणे दिसून येते.


संजय दत्तने नेहमीप्रमाणेच शुद्ध सिंहची खलनायकी भूमिका साकारली आहे. क्लायमॅक्सच्या वेळी तर ऋतिक रोशन आणि संजय दत्तच्या अग्निपथच्या क्लायमॅक्सची आठवण येते. रणबीर कपूरनेही मध्ये मध्ये 'खलनायक'मध्ये संजय दत्तसारखा अभिनय केला आहे. वाणी कपूरने नायिका सोनाची भूमिका जशी वाट्याला आली तशी साकारली आहे. त्यात उल्लेखनीय असे काही नाही. रोनित रॉयने छोटीशी भूमिका समरसून साकारली आहे.


करण मल्होत्राने दिग्दर्शनात काहीही कमाल दाखवलेली नाही. चित्रपट फक्त भव्यतेने सादर करण्यात त्याला यश आलं आहे. पण दिग्दर्शनात कुठेही त्याची चमक दिसली नाही.


चित्रपटात गाण्यांना काही वाव नसतानाही केवळ चित्रपटाची नायिका सोना नृत्यांगना असल्याने गाणी येतात. एक प्रेमगीतही आहे. पण त्यामुळे चित्रपट पाहताना विरस होतो.


निलेश मल्होत्रा आणि खिला बिश्त यांची कथा अत्यंत कालबाह्य आहे. करण आणि एकता पाठक मल्होत्राने पटकथा लिहितानाही विशेष चमक दाखवलेली नाही. पुढे काय होणार याचा प्रेक्षकांना अगोदरच अंदाज येतो आणि तेथे चित्रपट फसतो. पुढे काय होणार आणि ते कसे दाखवणार याची काहीही उत्सुकता जागी होत नाही. पियूष मिश्रांचे संवाद काही ठिकाणी चांगले आहेत. करम से डकैत, धरम से आझाद ही टॅगलाईन चांगली जमलीय.


एकूणच यशराजचा हा 'शमशेरा' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात संपूर्णपणे अयशस्वी ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


(केवळ रणबीरच्या अभिनयामुळे चित्रपटाला दोन स्टार दिले गेले आहेत. नाहीतर चित्रपटाला दीड स्टारच बरोबर आहेत.)