मुंबई : देशभरातल्या कलाकारांचे लक्ष लागून असलेल्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका वाजताना दिसला. मराठी चित्रपटांना एकूण सहा पुरस्कार जाहीर झाले आहेत.


शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 'नाळ' या मराठी चित्रपटाने दोन पुरस्कारांवर नाव कोरले आहे. या चित्रपटातल्या 'चैत्या'ची भूमिका साकारणाऱ्या श्रीनिवास पोफळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच चित्रपटासाठी दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवला आहे. आहे.

अभिनेते स्वानंद किरकिरे यांना 'चुंबक' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 'तेंडल्या' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साऊंड लोकेशन रेकॉर्डिंग हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 'पाणी' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. खरवस या मराठी लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कारांची यादी
⦁ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
⦁ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
⦁ सर्वोत्कृष्ट अभिनेता – आयुषमान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी)
⦁ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - किर्ती सुरेश (महानती)
⦁ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे (चुंबक)
⦁ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
⦁ सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीनिवास पोकळे (नाळ)
⦁ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - आदित्य धर (उरी)
⦁ सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक –सुधाकर रेड्डी यंकट्टी(नाळ)
⦁ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (पद्मावत)
⦁ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजीत सिंग (पद्मावतमधील बिंते दिल गाण्यासाठी)
⦁ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदू मनी
⦁ सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या आणि ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
⦁ सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट - केजीएफ
⦁ सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बधाई हो
⦁ सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पॅडमॅन
⦁ पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - पाणी