मुंबई : धोंडिबा कारंडे दिग्दर्शित 'पळशीची पीटी...गोष्ट हरवलेल्या प्रत्येकाची' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. या सिनेमाने कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीचे नाव गौरवित केले होते तसेच राज्य सरकारच्या पुरस्कारासह अनेक चित्रपट महोत्सवामध्ये सिनेमाची चांगलीच चर्चा झाली होती. येत्या 23 ऑगस्ट रोजी हो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'एबीपी माझा' या सिनेमाचा मीडिया पार्टनर आहे.


'लागिर झालं जी' फेम जयडी अर्थात किरण ढाणे आणि राहुल्या म्हणजे राहुल मगदूम सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

साताऱ्यातील पळशी गावातून जन्मलेल्या या कथेमध्ये भागी आणि विकास या दोन मुख्य पात्रांची कहाणी सांगण्यात आली आहे. भागीची तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा संघर्ष, यामध्ये तिला कोण मदत करतं किंवा कोण मागं खेचतं हे अगदी सहजपणे दाखवण्यात आलेलं आहे. तिच्या या धावत्या स्वप्नाचं काय होतं? यावर हा सिनेमा आधारलेला आहे.

पळशीची पीटी या सिनेमाला महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान देऊन गौरविण्यात आले तसेच संस्कृती कलादर्पण, गोवा मराठी चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तसेच आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातदेखील आपली चित्रपटरूपी कला सादर करण्याची संधी मिळाली.

दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट 'पळशीची पीटी' मध्ये 'भागी' ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे (लागिर झालं जी मधील आप्पा) , विद्या सावळे (लागिर झालं जी मधील मामी) , शिवानी घाटगे , दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे. लेखक तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागिर...मध्ये 'जितू काका' यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच संपादन केले आहे. दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांचा हा पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्यांची या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत.