मुंबई : शाहरुख खान... कुणीही कितीही नावं ठेवली तरी शाहरुख खान हा बॉलिवूडचा किंग खान आहे हे मान्य करावं लागेल. कारण एक दोन नव्हे तर तब्बल 29 वर्षं तो या इंडस्ट्रीत असून आजही तो तितकाच प्रभावी आहे. कारण, 'दिवाना' हा चित्रपट आला तेव्हापासून म्हणजे 25 जून 1992 पासून तो या इंडस्ट्रीवर राज्य करतो आहे. किती आले किती गेले...अनेकांसोबत त्याला स्पर्धा करावी लागली. पण जवळपास 29 वर्षं तो आपलं स्थान बॉलिवू़डनामक अळवावरच्या पानावर टिकवून आहे. आज गुगलवर त्याचे सगळे सिनेमे उपलब्ध आहेत. त्याची कारकिर्द सगळीच्या सगळी ऑनलाईन जगतात आहे. पण दोन महत्वांच्या गोष्टीवर आपण आज इथे प्रकाश टाकणार आहोत. शाहरुख इतका मोठा कसा झाला.. आणि त्यानं त्याचं स्थान कसं काय टिकवून ठेवलं त्याचा साधारण अंदाज येण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. 


ही गोष्ट आहे जेव्हा रईस प्रदर्शित होणार होता. रईस या चित्रपटाचं शाहरुखवर भलतं प्रेशर जाणवत होतं. कारण, यापूर्वी आमीर खानच्या दंगलने १०० कोटींचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आलेल्या सलमानच्या सुलतान या सिनेमानेही शंभर कोटींचा टप्पा लीलया पार केला होता. आता शाहरुखच्या रईसची बारी होती. आपल्या या सिनेमानेही शंभरी गाठावी असं त्याच्या मनात होतं. त्यासाठी त्याने आपली अशी व्युहरचना आखली. त्याने बऱ्याच पत्रकार परिषदा घेतल्या. गर्दी करुन नव्हे, प्रत्येकाला तो पर्सनली भेटत होता. तेव्हा त्याने सांगितलेला हा किस्सा. शाहरुख तेव्हाही 'द शाहरुख खान' होता. त्याला त्याच्या यशाचं गमक विचारल्यावर त्याने दिलेलं उत्तर थक्क करणारं होतं. 


सर्वसाधारणपणे आपल्या घरी काय शिकवलं जातं? तर अंथरुण बघून पाय पसरावे. हे आपल्या मनावर बिंबवलं जातं. ते योग्यही आहे. आपली कुवत पाहून खर्च करावा. आपली कुवत पाहून नवी झेप घ्यावी हा त्याचा अर्थ. पण त्याला सुरूंग लागला तो शाहरुखच्या या मुलाखतीवेळी. मेहबुब स्टुडिओमध्ये ही मुलाखत होती. या मुलाखती वेळी त्याला जेव्हा त्याच्या यशाचं गमक विचारलं तेव्हा तो म्हणाला, "मेरी मां मुझसे कहती थी.. बेटा,, अपने खर्चे कम मत करो. आमदनी बढाओ." या त्याच्या शिकवणीने सगळेच आवाक झाले. त्याचं म्हणणं असं होतं, की आपल्याला काय करायचं आहे हे आपण एकदा ठरवायला हवं. ते ठरवलं की त्या प्रत्येक गोष्टीचा दाम असतो. तो द्यावा लागतो. त्या किमतीत तफावत नको. पण तो मिळवण्यासाठी जेवढे आणि जसे कष्ट उपसावे लागतील ते उपस. 'खर्चे तो होंगे.. लेकीन खर्चे के लिये अपनी आमदनी बढाओ.'


आपल्या समान्य घरात याच्या उलटी शिकवण दिली जाते. पण शाहरुख या शिकवणीने लहानाचा मोठा झाला. या एका शिकवणीने जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. शाहरुखने आपल्या राहण्यात-वावरण्यात कधीच कसूर ठेवली नाही. कारण त्याला 'द शाहरूख खान' व्हायचं होतं. त्यासाठी लागेल ते कष्ट उपसायची त्याची तयारी होती. 


शाहरुख इंडस्ट्रीत आल्यावर राहातही तसाच होता. ही गोष्ट दिवानाच्याही आधीची. खरंतर बॉलिवूडमध्ये येऊन त्याला आता 29 वर्षं झाली असली तरी मनोरंजन क्षेत्रात येऊन त्याने तिशी कधीच ओलांडली आहे. कारण त्या आधी तो सर्कस, फौजी अशा मालिकाही करत होता. ही गोष्ट सर्कस या मालिकेची आहे. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेते मकरंद देशपांडेही काम करत होते. आज मकरंद देशपांडेही मोठ्या स्तरावर पोहोचले आहेत. अनौपचारिक गप्पांमध्ये बोलता बोलता सर्कसचा विषय निघाला आणि शाहरुखचा. त्यावेळी बोलताना मकरंद म्हणाले, "शाहरुख खान तेव्हाही शाहरुख खान होता. त्याला माहीत होतं आपण इथे कशासाठी आलो आहोत. सर्कसच्या चित्रिकरणावेळी आम्ही सगळेच स्ट्रगलर होतो. तसा तो ही. आम्ही आमच्या छोट्या छोट्या बॅग्ज घ्यायचो कामाला यायचो. काम झाल्यावर जायचो. पण शाहरुख हा शाहरुख होता. तो तेव्हाही त्याचं सगळं सामान घेऊन यायचा. त्याच्या मोठाल्या बॅग असायच्या. त्याचे कपडे, त्याचं वावरणं.. हे सगळं आपण जणू काही इथे स्टार व्हायलाच आलो आहोत असं होता. बोलायला अत्यंत खेळकर. मोकळा. पण तितकाच कामाबद्दल कष्ट उपसणारा."


या दोन गोष्टींमधून शाहरुख खान हा आज जवळपास 29 वर्षानंतरही शाहरुख खान का आहे हे दर्शवणाऱ्या आहेत. पहिली एक शिकवण आणि दुसरा त्याचा वावर. आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि आपल्याला कुठे पोचायचं आहे हे त्याला जणू आधीच माहीत होतं. त्यानंतर त्याला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी मान-मरातब दिले. त्यावेळचं त्याचं भाषण ऐकलंत तरी तो वास्तवात राहणारा माणूस आहे हे लक्षात येतं. 


महत्वाच्या बातम्या :