नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचं कळतं. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री असताना देशमुख यांचं ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानाचीही झाडाझडही होण्याची शक्यता आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात अनिल देशमुख यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.


मुंबईतील वरळी परिसरातील सुखदा या इमारतीमधील देशमुख यांच्या घरात आज (25 जून) सकाळी सात वाजता ईडीचं पथक पोहोचलं. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक वरळी पोलीस देखील हजर होते. तर आज सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारात या कारवाईला सुरुवात झाली. अतिशय गुप्तता या कारवाईबाबत बाळगण्यात आली. नागपूर पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. या कारवाईसाठी एवढी मोठी सुरक्ष का आणली असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.


दरम्यान महिन्याभरापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. नागपुरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफरनगर परिसरात एकाच वेळी ईडीच्या विविध पथकांनी 25 मे रोजी कारवाई केली होती. सागर भटेवारा, समित आयजॅक्स आणि कादरी बंधू यांच्या ठिकाणांची ईडीने झाडाझडती केली होती.




परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि अनिल देशमुख यांचा राजीनामा
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत असतानाच मे महिन्यात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक व्यवहाराच्या अँगलने ईडीनेही या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.


अनिल देशमुखांची लवकरच जेलमध्ये रवानगी होणार : किरीट सोमय्या
अनिल देशमुख यांची रवानगी लवकरच तुरुंगात रवानगी होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ईडीच्या कारवाईवर दिली. याबाबत ते म्हणाले की, "अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीचे छापे पडले, काही दिवसांनी जेलमध्ये रवानगी होणार आहे. घोटाळ्याचा पैसा कोलकातामधील कंपन्याद्वारे स्वतःचा कंपन्यांमध्ये वळवला. अशाच प्रकारच्या घोटाळ्यामुळे छगन भुजबळ 3 वर्ष जेलमध्ये होते. काही दिवसांनी अनिल परब यांचीही अशीच अवस्था होणार आहे."


विनाकारण त्रास दिला जातो : संजय राऊत
"विनाकारण त्रास दिला जात आहेत. जमिनीचे व्यवहारच कोणाचे काढायचे असतील तर सीबीआय आणि ईडीसाठी अयोध्यामधील जमीन खरेदी व्यवहार ही अत्यंत फिट केस आहे. तपास यंत्रणांनी तिथे जाऊन तपास करणं गरजेचं आहे. भाजपच्या महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव केला पाहिजे की अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडीने करावा," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.