औरंगाबाद : अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखवले नसल्याने निर्मात्याला 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. शहरातील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना चित्रपटात हे गाणे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले होते.


15 एप्रिल 2016 रोजी औरंगाबादच्या पीव्हीआर थिएटरमध्ये ‘फॅन’ हा चित्रपट लागला होता. शहरातील आफरीन फातिमा आणि त्यांची दोन मुले नबील, प्लोरा यांसोबत कुटुंबातील इतर 7 सदस्य चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. हा चित्रपट केवळ ‘जबरा फॅन’ हे लोकप्रिय गाणे असल्याने पाहण्यासाठी मुलांनी आग्रह केला होता. मात्र संपूर्ण चित्रपटामध्ये ‘जबरा फॅन बन गया’ हे गाणे दाखवण्यात आले नाही. त्यामुळे मुले नाराज झाली. या निणर्याविरोधात आफरीन फातेमा यांनी राज्य ग्राहक आयोगात अपील दाखल केले.

चित्रपटाच्या प्रमोशनवेळी ‘जबरा फॅन’ हे गाणे दाखवण्यात आलेले होते. मात्र, चित्रपटामध्ये हे गाणे दाखवले नसल्याने तक्रारदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला हे म्हणणे मान्य करत आयोगाने निर्माता आदित्य चोप्रा यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

अशी मागितली होती नुकसान भरपाई

आफरीन फातेमा चित्रपट पाहायला कुटुंबियांसोबत गेल्या होत्या. त्याचा खर्च 1050 रुपये, रिक्षाभाडे 500 रुपये, मध्यांतरातील नाश्ता कोल्ड्रिंक 1 हजार रुपये, चित्रपटात गाणी नसल्यानं रात्री मुलं जेवली नाही, त्यांना सकाळी अॅसिडिटी झाल्याने दवाखान्यापोटी 1 हजार रुपये, मानसिक त्रासापोटी 27 हजार रुपये आणि न्यायालयीन खर्च 30 हजार अशी 60,550 रुपयांची तक्रारदारांनी मागणी केली होती.

कोर्टानं अभिनेता शाहरुख खानच्या ‘फॅन’ चित्रपटामध्ये जबरा फॅन’हे गाणे दाखवले नसल्याने निर्मात्याला 15 हजाराचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची किंमत जरी कमी असली, तरी प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्यांना हा दणका आहे हे मात्र नक्की.