Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5 ) ग्रँड प्रिमिअर उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो सध्या कलर्स मराठीकडून शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे घरात नक्की कोण कोण जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मागील दोन प्रोमोमधून परदेसी गर्ल आणि गायक अभिजीत सावंतच्या नावाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एक प्रोमो शेअर करण्यात आला असून Desi Boyzची एन्ट्री होणार आहे. 


नुकताच कलर्स मराठी वाहिनीकडून प्रोमो शेअर करण्यात आला आहे. अरबाज पटेल आणि अभिनेता वैभव चव्हाण या दोघांच्या नावाच्या जोरदार चर्चा या प्रोमोमुळे सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारे हे देसी बॉईज नक्की कोण असणार यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. पण त्याआधी अनेकांनी या प्रोमोवर कमेंट्स करत या दोघांची नाव सांगितली आहेत. 


कोण आहे अरबाज पटेल?


एमटिव्हीच्या स्प्लिट्सविला या कार्यक्रमात अरबाज झळकला होता. तो सिझन 15 मध्ये सहभागी झाला होता. या सिझनमध्ये अरबाज चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर आता तो बिग बॉसच्याही घरात जाणार असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान शेअर करण्यात आलेल्या प्रोमोवरुन अरबाज असल्याचा अंदाजही प्रेक्षकांकडून वर्तवला जात आहे. 


कोण आहे वैभव चव्हाण?


वैभव हा झी मराठी वाहिनीवर बाजिंद या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेत त्याने रायाची भूमिका साकारली होती. त्यानंतर वैभव आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पण वैभव खरंच बिग बॉसच्या घरात जाणार का यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 






हे स्पर्धक होणार सहभागी? 


बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.  


रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार


काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.