मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. दरम्यान आता बिग बी अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे. नानावटी हॉस्पिटलकडून अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत. दरम्यान सकाळी उठून त्यांनी नाश्ता केला असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

तसंच त्यांचं मेडिकल बुलेटिन येणार नाही, अशी माहिती बिग बी यांनी स्वत: ट्विटरवरुन दिली आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती बीएमसीकडून घेण्यात येत आहे. तसंच अमिताभ बच्चन यांचा जुहूमधला 'जलसा' बंगला आता सॅनिटाईझ केला जाणार आहे.

सकाळी त्यांना हलका ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याची माहिती समोर आली होती. दुसरीकडे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. त्या दोघांनीही अॅंटिजन टेस्ट केली होती, त्यात ते पॉझिटिव्ह आले आहेत. आता त्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की बच्चनजी यातून लवकर बाहेर पडावेत, असं टोपे यांनी म्हटलं आहे.



बच्चन यांचं अनेक प्रमोशनल आणि प्रोफेशनल प्रोजेक्टवर वर्क फ्रॉम होम

लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रमोशनल आणि प्रोफेशनल प्रोजेक्टवर वर्क फ्रॉम होम केलं. मात्र असं असतानाही अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च मध्ये त्यांनी सार्वजनिक सेवेसंदर्भातील एका घोषणेचा व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांच्या घरातच शूट केला होता. जो हिंदी आणि इंग्रजी भाषेत शूट झाला होता. एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन हे एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसले.  'फॅमिली' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांच्या भूमिकेचं सगळं शूटिंग हे त्यांच्या घरीच करण्यात आलं. या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं महत्व सांगितलं होतं. यात अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, दिलजीत दोसांझ आणि रणबीर कपूरसह अन्य काही अॅक्टर्स दिसून आले होते.

Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

मे महिन्यात अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 12' साठी काही प्रोमोज आपल्या घरीच शूट केले. या शूटसाठी 'दंगल' आणि 'छिछोरे' चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रिमोटच्या साहाय्याने दिग्दर्शन केलं होते. फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन एका प्रोमोशनल/अॅड फिल्मच्या डबिंगसाठी आपल्या ऑफिसच्या स्टुडिओत गेले होते.

बच्चन यांनी स्वत: ट्वीट करत, कोरोना झाल्याचं सांगितलं होतं. 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी', अशी विनंतीही बच्चन यांनी केली होती.

संबंधित बातम्या
लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण

Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह