मुंबई : बॉलिवूड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर काही वेळातच मुलगा अभिषेक बच्चन याने देखील आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं. या दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याआधीच अमिताभ यांनी स्वतः ट्विट करुन याबद्दल माहिती दिली आहे.

अभिषेक यांचे ट्विट
मी आणि माझे वडील आम्हा दोघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्हाला दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मी सर्व स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. मी सर्वांना विनंती करतो की शांत राहा आणि घाबरू नका. धन्यवाद


अमिताभ यांचे ट्विट -
माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घरातील सदस्यांच्याही कोरोना चाचणी करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मागील 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करावी, अशी विनंतीही बच्चन यांनी केली आहे.

अमिताभ आणि अभिषेक यांना सौम्य लक्षणं
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अमिताभ यांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे.

कुटुंब आणि स्टाफ क्वॉरंटाईन
अमिताभ बच्चन यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या घरातील स्टाफचा कोरोना चाचणी करण्यात आलीय. सर्वांनी स्वतःला क्वॉरंटाईन करुन घेतले आहे. कुटुंबातील सदस्य आणि स्टाफचा रिपोर्ट येणे बाकी आहे.

Amitabh Bachchan Corona positive | कोरोना झाल्याने महानायक अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल