Bhuban Badyakar : लोकं रातोरात सेलिब्रेटी कधी बनतात ते कळतही नाही, पण पाहिलं तर प्रसिद्धीही सोबत एक वेगळीच व्यथा घेऊन येते. असाच काहीसा प्रकार 'कच्चा बदम' फेम गायक भुवन बड्याकरसोबत (Bhuban Badyakar) घडला. या गाण्याने त्याला एका रात्रीत सोशल मीडिया स्टार बनवले. भुवन स्टार झाला अन् देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लोक त्याला ओळखू लागले. काही सेलेब्सनी त्यांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच्यासोबत नृत्य केले.


मग काय, भुवन बड्याकर स्वतःला 'सेलिब्रेटी' समजू लागला. याच कार्यक्रमात भुवनने सांगितले की, आता त्याला शेंगदाणे विकण्याची गरज नाही, कारण तो लोकप्रिय झाला आहे, सेलिब्रिटी बनला आहेत. त्याचे हे वक्तव्य सोशल मीडिया यूजर्सना आवडले नाही. त्याचे हे बोलणे सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले. 


भुवनने मागितली माफी!


आता भुवन बड्याकरने त्याच्या 'सेलिब्रेटी' वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. गरज पडली तर पुन्हा शेंगदाणे विकण्यासाठी घराबाहेर पडणार असल्याचे त्याने म्हटले. भुवन म्हणाला की, ‘मला आता जाणवले की मी असे बोलायला नको होते. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवले आणि आता पुन्हा त्याच परिस्थितीत उभा राहिलो तर, परत शेंगदाणे विकायला सुरुवात करेन.’


भुवन पुढे म्हणाला की, ‘मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला लोकांचे इतके प्रेम मिळाले. मी एक साधा माणूस आहे आणि या साधेपणानेच मी माझे जीवन जगतो. स्टारडम, मीडिया अटेन्शन आणि ग्लॅमर या गोष्टी माणसाबरोबर कायमच्या राहत नाही. मला तुम्हा सर्वांना खात्रीने सागायचे आहे की, मी माणूस म्हणून बदललो नाही. तुम्ही सर्वांनी मला व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे मी अजूनही तसाच सामान्य माणूस आहे.’


शेंगदाणे विकून पैसे कमवायचा भुवन बड्याकर


भुवन बड्याकर हा पश्चिम बंगालचा आहे. तो सायकलवरून शेंगदाणे विकण्याचे काम करतो. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याने 'कच्चा बदाम' हे गाणे तयार केले. जेव्हापासून त्याचे हे गाणे सोशल मीडियावर आले आहे, तेव्हापासून त्याच्या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भुवनचे टॅलेंट पाहून त्याला एका क्लबमध्ये गाण्याची संधीही देण्यात आली.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha