Arvind Kejriwal : पंजाब विधानसभा (Punjab Assembly 2022) निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाने बहुमत मिळवत इतिहास रचला आहे. भगवंत मान (Bhagwant Mann) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून ते 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अमृतसरला पोहोचतील. केजरीवाल भगवंत मान यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड शो करणार असून त्यानंतर हे दोघेही हरमिंदर साहिबला जाणार आहेत.


अरविंद केजरीवाल रविवारी सकाळी 11 वाजता अमृतसर विमानतळावर पोहोचतील. केजरीवाल आणि भगवंत मान विमानतळावरून हरमिंदर साहिबला जाणार आहेत. तिथून जालियनवाला बाग, दुर्गियाना मंदिर आणि त्यानंतर दर्शनासाठी वाल्मिकी धामला पोहोचतील. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा रोड शो अमृतसरमध्ये दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यामध्ये आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.


शपथे विधीपूर्वी भगवंत मान काय म्हणाले?
भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी शनिवारी त्यांनी मोठे वक्तव्य केले. भगवंत मान म्हणाले की, 'आमचा प्रयत्न असेल की लोकांची कामे त्यांच्या घरीच व्हावीत. आम्ही मते मागायला त्यांच्या घरी जातो, मग जनतेला त्यांच्या कामासाठी चंदीगडला का बोलावतो. पंजाब सरकार लोकांच्या दारापर्यंत पोहोचेल.'


दरम्यान, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा हटवल्याच्या बातमीवर पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, 'पोलीस ठाणी रिक्त आहेत. आम्ही पोलिसांचे काम पोलीस दलाकडूनच करुन घेऊ. मला वाटते की पंजाबची सुरक्षा काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.'


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha