Ahmednagar Mahakarandak : हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा 'अहमदनगर महाकरंडक 2022, उत्सव रंगभूमीचा-नवरसांचा' ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. यावेळी नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहमदनगरच्या 'अऽऽऽय...!' या एकांकिकेने प्रथम तर अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट, डोंबिवलीच्या 'हायब्रीड' या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला 1,11,000 आणि उपविजेत्या संघाला 51,111 रुपये पारितोषिक मिळालं.


अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंदजी फिरोदिया, सुपरस्टार स्वप्नील जोशी, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. तर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता- दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी उपस्थिती लावली होती.


नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील जोशी यांच्या आगामी बहुभाषिक ‘1ओटीटी’ या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या 'काम करी दाम' या वेब सिरीजचा टिझर यावेळी लाँच करण्यात आला. आगामी ओटीटी आणि महाकरंडकविषयी बोलताना सुपरस्टार स्वप्नील जोशी म्हणाले की, ही स्पर्धा आता वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. उत्कृष्ट आयोजन आणि भव्यता हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या एकांकिका या ठिकाणी बघता येतात. त्यामुळे ही एक पर्वणीचं आहे. आम्ही 1ott च्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नक्कीच संधी देऊ.


डिजिटल स्वरूपात पाहायला मिळणार एकांकिका


चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले की, दोन वर्षं कोविडमुळे स्पर्धा होऊ शकली नव्हती. आम्हाला पण घाई नव्हती. कारण 50 टक्के उपस्थितीत ही स्पर्धा आम्हाला घ्यायची नव्हती. तसेच,  व्यासपीठावर सादर होणाऱ्या एकांकिका आता डिजिटल स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. नवोदित कलाकारांना 1OTT वर संधी मिळणार असल्याची घोषणाही यावेळी फिरोदिया यांनी केली.


वेब सिरीजच्या आहारी जाऊन बटबटीतपणा रंगभूमीवर आणू नका!


नाटक ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ही कला सांघिक कामगिरीवर अवलंबून असते, असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात केले. सर्व एकांकिकांचे कौतुक तर त्यांनी केलेच, तसेच स्पर्धेच्या उत्तम नियोजनाचे कौतुकही केले. वेब सिरीजचा प्रभाव बऱ्याच लेखक आणि दिग्दर्शकांवर जाणवला. मला आवर्जून सांगावसं वाटतंय वेब सिरीजच्या आहारी जाऊन बटबटीतपणा रंगभूमीवर आणू नका. नाटक हे नाटकासारखंच व्हायला हवं, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. तसेच संवादलेखनाच्या बाबतीत आपण काहि गोष्टी ठरवल्या पाहिजेत. 30 मिनिटांच्या एकांकिकेत आपण एकच वाक्य कितीदा बोलतो,  एकच मुद्दा कितीदा बोलतो यावर लक्ष द्यायला हवं. महिला लेखकांची संख्या वाढायला हवी, असं ही चंद्रकांत कुळकर्णी यांनी सांगितलं.


झी मराठीवर संधी मिळणार!


स्पर्धेत प्रथम आलेल्या अऽऽऽय...! या एकांकिकेचं दोन अंकी व्यावसायिक नाटकात रूपांतर करून त्याची त्यांच्या संस्थेतर्फे निर्मिती करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. नाटक जगा आणि रंगभूमीची सेवा करत रहा, असं सांगताना गुणी कलाकारांना झी मराठीच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये संधी देणार असल्याचं अद्वैत दादरकर यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी सांगितलं. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं जगणं बघायला मला आवडतं. प्रत्येक भागातून आलेल्या मुलांनी त्यांचं जगणं इथे मांडलं हे कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.


परीक्षक श्वेता शिंदे यांनी स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्यात बोलताना स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले. वेब सिरीजच्या जास्ती जाऊ नका, संवादाच्या बाबतीत सतर्क राहायला हवं. जास्तीत-जास्त रिअ‍ॅलिस्टीक लिहिण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच नवोदित कलाकार, दिग्दर्शकांना आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या कलाकृतींमध्ये संधी देणार असल्याची घोषणा देखील केली.


120 एकांकिकांमधून 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड!


घरोट, दोरखंड, जनावर, काली, जखणाई, सोडवणूक, कुस्ती, जो जे वांछील, बारस, बिली मारो सारख्या अनेक  एकांकिकांनी यावेळी प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने झालेल्या या स्पर्धेत 120 एकांकिकांमधून 33 एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


हेही वाचा :


Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!


Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!