Avdhoot Gupte Birthday :  गायक, संगीतकार, निर्माता, सूत्रसंचालक, परिक्षक,दिग्दर्शक अशा अनेक भूमिकांमधून समोर येणाऱ्या अवधूत गुप्तेची (Avdhoot Gupte) गाणी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. तसेच त्याच्या अनेक गाण्यांसाठी आजही तो प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडतो. त्याच्या गाण्यांसोबत अवधूतला त्याच्या चित्रपटांसाठी देखील प्रेक्षक विशेष ओळखतात. अवधूत गुप्तेचा आज वाढदिवस आहे. आजवर प्रेक्षकांनी अवधूतचचा सुरेल प्रवास अनुभवला. नुकतचं अवधूतचं खोटारडी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


मूळचा कोल्हापूरचा असलेल्या अवधूतने त्याचं कोल्हापूर वरचं प्रेमही अनेकदा बोलून दाखवलं आहे. इतकच नव्हे तर त्याने कोल्हापूरवर केलेल्या गाण्याला कोल्हापूरांनी देखील मनभरुन दाद दिली. अवधूतचा जन्म 19 फेब्रुवारी 1977 साली झाला. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले आहे. तसेच स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. सागरिका म्युझिक कंपनीच्या 'पाऊस' या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून अवधूतने पदार्पण केले. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील अवधूत प्रेक्षकांच्या भेटीला आला. 


सारेगमपमध्ये स्पर्धक होता अवधूत


सारेगमप मराठी, सूर नवा ध्यास नवा यांसारख्या कार्यक्रमांचे परिक्षण केलेल्या अवधूतने त्याच्या करिअरची सुरुवात मात्र सारेगमप हिंदीमध्ये स्पर्धक म्हणून केली आहे. त्यावेळी सोनू निगम हे सूत्रसंचालन करत होते. दरम्यान 1996 साली सारेगमपच्या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्याने सारेगमपच्या मंचावर पहिलं गाणं हे बडे अच्छे लगते हे, हे गायलं होतं. त्यानंतर अवधूतने मागे वळून अजिबात पाहिलं नाही. त्याने अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती तर केलीच पण ती गाणी संगीतबद्ध देखील केलीत. 


'ऐका दाजीबा'ची तरुणाईला क्रेज


अवधूतने त्याच्या करिअरची सुरुवात 2002 साली कम्पोजर म्हणून केली होती. यावेळी त्याने पाऊस या अल्बममधील 8 गाण्यांसाठी कम्पोजरचे काम केले. यासाठी त्याला अल्फा गौरव पुरस्कारही मिळाला. अवधूत गुप्ते हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला तो त्याच्या ऐका दाजीबा गाण्यामुळे. नुकतच या गाण्याला 21 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने देखील अवधूतने एक खास पोस्ट करत ऐका दाजीबाचं रियुनीअन केलं असल्याचं म्हटलं होतं. तसेच या गाण्यातील कलाकार आणि गायक ह्यांनी मिळून या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता.  2002 मध्ये संगीतप्रेमींच्या भेटीस आलेलं हे गाणं संगीत कलाविश्वात तुफान गाजलं आणि त्याची क्रेज आजही तरुणाईला कायम आहे. या गाण्यामध्ये मिलिंद गुणाजी आणि इशिता अरुण ही जोडी दिसली होती. 


दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात


2010 साली झेंडा या चित्रपटापासून त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. राज्यातील तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा हा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व्यथा मांडणारा हा चित्रपट होता. त्यावेळी या चित्रपटामुळे बरेच वादही झाले. पण अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच आता अवधूतने झेंडा -2 या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे.  त्यानंतर अवधूत गुप्तेचा मोरया चित्रपटही तितकाच गाजला. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आणि त्याला आता मिळालेलं स्वरुप, गणेशमंडळातील वाद, राजकारण यासगळ्यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. त्यानंतर कान्हा, एक तारा अशा अनेक चित्रपटांची निर्मिती अवधूतने केली. 



अशी आहे अवधूतची लव्हस्टोरी


अवधूतने त्याची बालपणीची मैत्रीण गिरिजासोबत लग्नगाठ बांधली आहे. गिरीजा आणि अवधूत एका परिसरात राहत होते. त्यामुळे त्याला गिरीजा माहित होती आणि हळूहळू ती आवडू देखील लागली. शेवटी एक दिवस अवधूतने गिरिजाला प्रपोज केलं. पण त्यावेळी गिरीजाने त्याला एक अट घातली होती. गिरिजाने म्हटलं होतं की, 'नुसते प्रपोज करुन चालणार नाही तर माझ्याशी लग्न करावे लागेल.' सुरुवातीला अवधूत गिरिजाची ही अट मी विचार करुन सांगतो असं म्हणत ऐकून तिथून पळून गेला. पण काही दिवसांनी त्याने गिरीजाला लग्नाचं वचन दिलं आणि त्या दोघांनी लग्न केलं. 


ही बातमी वाचा : 


Kiran Mane :'या धाडसासाठी त्याची पाठ थोपटावी लागली', किरण मानेंची भरत जाधवांसाठी खास पोस्ट