Kiran Mane Post on Bharat Jadhav :  अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात. नुकतच त्यांनी राजकाराणात देखील प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. आता पुन्हा एका नव्या पोस्टमुळे किरण माने हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. किरण माने यांनी अभिनेते आणि निर्माते भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. भरत जाधव यांची निर्मिती असलेल्या 'अस्तित्व' (Astitva) या नाटकासाठी त्यांनी भरत जाधवचं मनापासून अभिनंदन करत त्यांची पाठ देखील थोपटली आहे. 


 नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आलं.  भरत जाधव एण्टरटेनमेंटने अस्तित्व या नाटकाची निर्मिती केलीये. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित 'अस्तित्व' या नाटकाचा  3 नोव्हेंबर 2023 रोजी शुभारंभाचा प्रयोग झाला होता. या नाटकामध्ये चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. 


किरण माने यांनी काय म्हटलं?


भरत जाधवच्या अस्तित्व या नाटकाचं कौतुक करत म्हटलं की, 'भरत जाधवचं अभिनेता म्हणून कौतुक करण्याआधी 'निर्माता' म्हणून त्याची पाठ थोपटावी वाटली. 'धंदा' या गोष्टीचा विचार न करता त्यानं एक आशयघन, गंभीर आणि अस्सल मराठी नाटक रंगभूमीवर आणलं... 'अस्तित्व' ! व्यावसायिक नाटक म्हटलं की एक चकचकीत शहरी उच्चवर्गीय जोडपं आणि त्यांच्यातले पुचाट भाबडे समज-गैरसमज, गोड गुळमट गाणी, अधूनमधुन 'पेरलेले' टाळीबाज सुविचार आणि शेवटी सगळे गैरसमज दूर होऊन पडदा पाडणं... नाटक संपल्यावर डायबेटिस होतोय का काय अशी भिती वाटते. हल्ली नाटकांची उथळ नांवं आणि चकचकीत रंगीबेरंगी पोस्टर्स बघुनच शिसारीच येते.'


'निर्माता म्हणून तुझं सर्वात आधी अभिनंदन'


अशा भयाण परिस्थितीत एक असं नाटक आणणं, ज्यात नाटकभर चाळीतली रंग उडालेली खोली दिसते... नाटकाचा हिरो बीएमसी मधला सफाई कामगार आहे, ज्याच्या आयुष्यातले रंगही असेच उडून गेलेत... नाटकभर त्याची आणि त्याच्या कुटूंबाची वेदना आणि दु:ख... हे सगळं एका कोपर्‍यात बसून पहाणारे तथागत बुद्ध आणि डाॅ.आंबेडकर !सगळंच 'व्यावसायिकते'च्या सगळ्या गणितांना छेद देणारं. 'अस्तित्व'चा अफलातून, जबराट लेखक, दिग्दर्शक स्वप्निल जाधव...आणि सगळे कलाकार याविषयी सविस्तर लिहीन नंतर... पण आधी असा विषय रंगभूमीवर आणायचं धाडस दाखवल्याबद्दल निर्माता म्हणून भरतचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं, असं किरण माने यांनी म्हटलं. 


खूप दिवसांनी नाटक बघून न मन आणि मेंदू तृप्त झाले - किरण माने


पैसा कमावण्यासाठी सुमार नाटकं आणि त्यांचे ढीगभर प्रयोग 'छापणार्‍यांची' सद्दी असण्याच्या काळात निर्माता भरतनं वेगळा मार्ग निवडणं, हे खुप प्रेरणा देणारं आहे. जयंत पवार, विजय तेंडूलकर अशा नाटककारांच्या जवळपास जाणारी संहिता आजच्या भाकडकाळात येणं आश्वासकही आहे. लै दिवसांनी व्यावसायिक नाटक बघुन मन आणि मेंदू तृप्त झाले... लब्यू भरत, अशा आशयाची पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे. 


ही बातमी वाचा : 


Gharoghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला; नात्यांचं महत्त्व सांगणाऱ्या मालिकेत दिसणार 'ही' बालकलाकार