Ashutosh Kulkarni On Aadesh Bandekar: गुजराती निर्मात्यानं 5 महिने मानधन थकवलेलं, आदेश बांदेकरांनी मध्यस्थी करताच...; मराठी अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा
Ashutosh Kulkarni On Aadesh Bandekar: 'असंभव' या गाजलेल्या मालिकेत झळकलेला मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी यानं आदेश बांदेकरांनी केलेल्या मदतीचा किस्सा नुकताच एका मुलाखतीत बोलताना सांगितला.

Ashutosh Kulkarni On Aadesh Bandekar: महाराष्ट्राचे लाडके भावोजी, आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या स्वभावाचे आपण अनेक किस्से ऐकलेत. तसेच, मदतीसाठी तप्तर असलेल्या आदेश बांदेकरांबाबतही आपण अनेक सेलिब्रिटींच्या तोंडून ऐकलंय. अशातच आता आणखी एका मराठी कलाकारानं (Marathi Celebrity) आदेश बांदेकरांनी केलेल्या मदतीबाबत एका मुलाखतीत बोलताना सांगितलं आहे. मराठमोळा अभिनेता आशुतोष कुलकर्णी (Marathi Actor Ashutosh Kulkarni) यानं एका गुजराती निर्मात्यानं (Gujarati Producer) थकवलेलं मानधन आदेश बांदेकरांच्या मध्यस्थीमुळे मिळालं, असं सांगत संपूर्ण किस्सा सांगितला आहे.
'असंभव' या गाजलेल्या मालिकेत झळकलेला मराठी अभिनेता आशुतोष कुलकर्णी यानं आदेश बांदेकरांनी केलेल्या मदतीचा किस्सा नुकताच एका मुलाखतीत बोलताना सांगितला. 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष कुलकर्णी यानं हा किस्सा सांगितला. एका गुजराती निर्मात्यानं तब्बल 5 महिने मानधन थकवलेलं, त्यानंतर सातत्यानं होणाऱ्या दिरंगाईला कंटाळून सर्वजण आदेश बांदेकरांकडे मदत मागण्यासाठी गेले. त्यानंतर काहीच दिवसांत थकीत मानधन मिळाल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे.
आशुतोष कुलकर्णी आदेश बांदेकरांसोबतचा किस्सा सांगताना काय म्हणाला? (Ashutosh Kulkarni How Aadesh Bandekar Helped)
आशुतोष कुलकर्णी म्हणाला की, "एक मराठी मालिका होती, जिचे फायनान्सर गुजराती होते. त्यांची टीम चांगली होती, पण कुठे गणित चुकलं माहिती नाही. टीमसोबत मिसकम्युनिकेशन झालं आणि सगळंच बिघडलं. मालिका इतकी छान होती, सुंदर टायटल साँग होतं, मी मालिकेच्या पोस्टरवर होतो अचानक मालिका बंद करणार असा निर्णय आला. मग त्या निर्मात्यांनी हात आखडता घेतला..."
"मालिकेत कलाकारांचं मानधन हे तीन महिन्यांनी मिळतं. मालिका बंद झाली, शूटिंग संपलं, त्यामुळे पुढच्या तीन महिन्यात मानधन अपेक्षित होतं, जे आलंच नाही. मग हळूहळू कलाकार जमायला लागले. निर्मात्याच्या ऑफिसला जाऊ लागले. तो माणूस परागंदा झाला नव्हता, परंतु तो दिरंगाई करत होता. पाच महिने झाले, तसा सगळ्यांचा संयम सुटू लागला. बरेच दिग्गज कलाकारही त्यात होते. एका पॉईंटला सगळ्यांना वाटू लागलं की आता काही पेमेंट मिळणार नाही. मग आम्ही मदत मागायची ठरवली." असं आशुतोष कुलकर्णीनं सांगितलं.
आदेश बांदेकरांबाबत आशुतोष कुलकर्णी काय म्हणाला?
आदेश बांदेकरांसोबतचा किस्सा सांगताना आशुतोष कुलकर्णी म्हणाला की, "आम्ही सगळे मिळून आदेश बांदेकर यांच्याकडे गेलो. ते प्रचंड प्रभावशाली आहेत. हे मला पहिल्यापासून माहिती होतं. आम्हाला कल्पना होती की आदेश दादा काही ना काही मार्ग काढेल. बाकी संस्था आहेत, ज्यांचं सदस्यत्व आपण घेतो, पण त्यावेळी आम्हाला तिथे जावंसं वाटलं नाही. त्यांनी कदाचित केलीही असती मदत, पण आम्ही आदेशदादाकडे गेलो..."
आशुतोष म्हणाला की,"आदेशदादानं ताबडतोब आमचा प्रॉब्लेम समजून घेतला. आम्हाला खात्री दिली, की काळजी करु नका, मी आहे. त्यानं शब्द दिल्याप्रमाणे अक्षरशः पुढच्या 12-15 दिवसांत सगळ्यांचं पेमेंट आलं. त्यानं फोन करुन त्या निर्मात्याला बोलावून घेतलेलं. आदेश दादाचा फोन आल्यानं त्या निर्मात्यालाही सिरिअसनेस आला की, हे प्रकरण कुठेतरी वेगळीकडे चाललंय. कदाचित त्याच्यावर दबावही आला असू शकतो..." पुढे बोलताना आशुतोषनं सांगितलं की, "आदेश दादानंही त्या निर्मात्यांना चांगला मान दिला. त्यांना बोलावलं, चहा पाणी दिलं, सिद्धिविनायक मंदिरात नेलं, आम्हाला दर्शन घडवलं. सगळ्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारे समजवलं. आदेशदादानं त्यांना समजावलं की, हे मराठी कलाकार आहेत, इथलं पेमेंट स्केल आधीच टाईट असतात, तर तुम्ही असं नका करू. मग त्यांनी ते पेमेंट दिलं, ते अॅक्चुअली कॉम्प्रोमाईज करायला म्हणत होते, म्हणजे तुम्ही राहिलेलं चार पाच महिन्यांचं मानधन अर्धच घ्या. पण ते कठीण जातं, कारण आधीच मराठीत पर डे अर्धा असतो..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















